नाशिक : रिटर्न गिफ्ट म्हणून मिळाले 21 कंत्राटी कामगारांना ‘कायम’ची भेट | पुढारी

नाशिक : रिटर्न गिफ्ट म्हणून मिळाले 21 कंत्राटी कामगारांना ‘कायम’ची भेट

नाशिक : (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी यंदाही वाढदिवसाचे औचित्य साधून औद्योगिक महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून एमआयडीसी भागातील 21 कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम नियुक्तीचे पत्र देत अनोखे रिटर्न गिफ्ट दिले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुर्तडक यांचा नुकताच अभीष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात मखमलाबाद नाका येथे साजरा करण्यात आला.

औद्योगिक वसाहतीतील आशा किंग मल्टी कार पार्किंग आणि बजाज सन्स या दोन्ही कंपन्यांत हे कर्मचारी कायम करण्यात आले आहेत. मुर्तडक यांच्या अभीष्टचिंतनावेळी जगद्विख्यात निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीराम कुलकर्णी यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी मोफत निसर्गोपचार शिबिराचे आयोजन कैलास युवक मित्रमंडळाने केले होते. यावेळी जवळपास पाचशेहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. विविध क्षेत्रांतील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. ही निसर्गोपचार पद्धती सर्व आजारांवर असल्याने तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण सहभागी झाले होते. अभीष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधत औद्योगिक महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असता तेथे दीडशेहून अधिक दात्यांनी रक्तदान केले. प्रसंगी डॉ. श्रीराम कुलकर्णी, नरेंद्र ठक्कर, हरिभाऊ लोणारी, गणेश पाटील, मनोज चोरडिया, बळवंत गोडसे, डॉ. प्रणव दुल्ला, गुरुमित बग्गा, सागर चव्हाण, संजय बुटे, विशाल मुर्तडक, अरुण हरकळ, रंगनाथ भारस्कर, नरेश पाटील, अनिल लहामगे, कुमार विशाल आदींसह विविध राजकीय पक्षांतील मान्यवर, पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button