नगर : कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा ; आ. संग्राम जगताप यांनी वेधले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष | पुढारी

नगर : कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा ; आ. संग्राम जगताप यांनी वेधले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात खून, दरोडे तसेच जातीय दंगलीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दिवसाढवळ्या चोर्‍या, घरफोडी तसेच चैन स्नॅचिंग सारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत, ठोस उपाययोजना करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. आ. जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले.

जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेचा गुन्हेगारांवर कोणत्याही प्रकारचा धाक राहिल्याचे दिसत नाही. वाढत्या गुन्हेगारीकडे पोलिसांचे अक्षरशः दुर्लक्ष झालेले दिसत आहे. यामुळे नागरिकांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

नगर शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा आहेत. जिल्ह्यासह राज्यभारातून ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात. शहरामध्ये वारंवार गैरप्रकार होत असून, त्यामुळे निर्माण होणार्‍या जातीयवादी तणावातून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचा परिणाम थेट बाजारपेठ तसेच व्यापारी वर्गावर होत असतो. त्यामुळे ग्राहक व व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. त्याचा नाहक त्रास होऊन आठ-दहा दिवस बाजारपेठ बंद ठेवावी लागते. त्याचा परिणाम थेट व्यवसायावर होतो. सर्व व्यवहार ठप्प होतात. याचबरोबर राज्यभर शहराची बदनामी देखील होत असते.

या सर्व बाबींची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन शहरासह जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी संबंधितांना आदेश पारित करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Back to top button