Nashik : ग्रामविकासाचे उत्कृष्ट उदाहरण थेरगाव  | पुढारी

Nashik : ग्रामविकासाचे उत्कृष्ट उदाहरण थेरगाव 

नाशिक : वैभव कातकाडे

जिल्ह्यातील सधन तालुका म्हणून ज्या तालुक्याची ओळख आहे अशा निफाड तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायतीने स्वच्छता, पाणीपुरवठा, ग्रामयंत्रणा, घनकचरा अशा सर्वच प्रकारच्या योजनांमधून आपले गाव विकसित केले आहे. या गावाचा कारभार एकहाती असल्याचा हा फायदा असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

नुकताच या ग्रामपंचायतीला स्व. आर. आर. पाटील जिल्हा आणि तालुकास्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वीही गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार तसेच माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते गावाला २००५-०६ मध्ये निर्मल ग्राम राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझरपासून १३ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव बाणगंगा नदीच्या डाव्या किनाऱ्यावर आहे. त्यामुळे पाणी जरी मुबलक असले तरी गावाने विविध योजनांतून पाणी स्वच्छ करण्यासाठी यंत्रे, पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने यशस्वी प्रयत्न केल्याचे दिसून येते. अवघे १३८ हेक्टर क्षेत्र असलेल्या या गावात भूमिगत गटार हा प्रकल्प १०० टक्के यशस्वी झाला आहे. गावातील प्रत्येक घराच्या बाजूला असलेल्या सरळ रेषेत ही गटार आहे. एखाद्या वास्तुविशारदाला लाजवेल अशा पद्धतीने सांडपाण्याचा निचरा करण्यात आलेला आहे.

ओझरपासून सुकेणेला जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला अतिशय सुबक असे ग्रामपंचायत कार्यालय लक्ष वेधून घेते. त्यामध्ये असलेली माहितीपर फलके गावाची सद्यस्थिती दर्शवते. याच ठिकाणी आपले सरकारमार्फत ग्रामस्थांना विविध सेवा दिल्या जातात. गावात अवघी २०० कुटुंबे गुण्यागोविंदाने राहतात. ९५० इतकी लोकसंख्या असलेल्या या गावात लिंगगुणोत्तरही उल्लेखनीय आहे. या गावात ४९१ पुरुष, तर ४५९ महिला आहेत. ५५ टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. त्यामुळे या गावात अंतर्गत रस्ते जोडणीसाठी ठक्कर बाप्पा योजनेचा पुरेपूर वापर केलेला आहे.

गावाने सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील मुलींचे बचत खाते ग्रामपंचायतीच्या १५ टक्के निधीतून उघडले आहे. महिला सक्षमीकरणासाठी उचललेले हे महत्त्वाकांक्षी पाऊल तालुक्यात गावाचे नाव उंचावते. गावाने गावातील मुलांच्या भविष्याचा विचार करता लोकसहभागातून अभ्यासिका उभारली आहे. स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, असे या वाचनालयाचे नाव असून, लोकवर्गणीमधून या ठिकाणी पुस्तके मागवली जातात. कोणाचा वाढदिवस असल्यास त्याच्याकडून अभ्यासिकेसाठी पुस्तकांची मागणी केली जाते आणि ग्रामस्थही या शाश्वत कार्यासाठी आनंदाने मदत करतात. गावात रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग यशस्वी झाला आहे. शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर आदी ठिकाणांहून वाहून जाणारे पाणी साठविण्यात येत आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांना हेच पाणी दिले जाते. ग्रामस्थांनी मिळून बंधाऱ्यातील गाळ काढत वनराई बंधाराही बांधला आहे. गावातील महिला बचत गट तसेच महिला ग्रामस्थ मिळून महिन्यातून एक दिवस गावाची साफसफाई करतात.

गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणीपुरवठा केल्याने गेल्या पाच वर्षांत दूषित पाण्यामुळे होणारे आजार प्रतिबंधित झाले आहेत. एकही साथीचा आजार उद्भवला नसल्याने राज्य शासनाने चंदेरी कार्ड देऊन गावाला सन्मानित केले आहे. कोरोना विषाणूमुळे गावाला सुरुवातीला संसर्ग झाला होता. मात्र, शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांमुळे गाव कोरोनामुक्त राहिले. तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप कराड, गावचे सरपंच दत्तू बोराडे आणि ग्रामसेवक प्रवीण भवरे हे गावची धुरा सक्षमपणे सांभाळत आहे.

आयएसओ अन् साईनाथ

पर्यावरणपूरक कामे करताना गावाने सर्व घरांना एलईडीचे महत्त्व सांगितल्याने गावात प्रत्येक घरात एलईडी वापरली जाते. गावातील स्मशानभूमी ही उत्कृष्ट कामाचा एक नमुनाच आहे. गावाने अल्पावधीतच आयएसओ मानांकन मिळाले हे आणखी एक वैशिष्ट्य होय. गावातील साईनाथ नामक व्यक्ती रोज न चुकता तीनचाकी सायकल घेऊन गावभर फिरतो आणि गावातील २०० घरांचा कचरा गोळा करून शोषखड्ड्यात टाकतो. त्याचवेळी चुकून गावात आलेले प्लास्टिक गोळा करून तेदेखील गावाने उभारलेल्या प्लास्टिक केंद्रात जमा केले जाते. हा साईनाथ खऱ्या अर्थाने गावातील स्वच्छतेची चळवळ समर्थपणे पुढे नेत आहे.

हेही वाचा :

 

Back to top button