नाशिक : 'नमामि गोदा'ची उगमस्थळीच उपेक्षा, प्रक्रिया न करताच पात्रात... | पुढारी

नाशिक : 'नमामि गोदा'ची उगमस्थळीच उपेक्षा, प्रक्रिया न करताच पात्रात...

त्र्यंबकेश्वर : देवयानी ढोन्नर

नदी संवर्धनासाठी केंद्र नमामि गोदा प्रकल्प राबविला जात असून, या अंतर्गत गोदावरी नदीचे जलप्रदूषण कमी करण्यासाठी कोट्यवधींची निधी खर्च केला जात आहे. असे असले तरी गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर शहरातून वाहणाऱ्या या नदीमध्ये थेट सांडपणी, प्रकल्पाचे पाणी प्रक्रिया न करतानच सोडले जात असल्याने उगमस्थानीच गोदावरीची उपेक्षा होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदावरीच्या स्वच्छता, सवंर्धनासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे. तसेच विविध पर्यावरण संस्थांकडून प्रबोधन केले जात आहे. त्यातही शहरातील गटारीचे पाणी नदीत सोडताना त्यावर प्रक्रिया करूनच ते सोडले जाते, असे न्यायालयाचे आदेश आहेत. असे असले तरी त्र्यंबकेश्वर शहरात गोदावरी नदीचे दृश्य अत्यंत दयनीय आहे. सध्या त्र्यंबकेश्वर येथे सांडपाणी स्वतंत्र करण्यासाठी भुयारी गटार योजना आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्र उभारणी याचे काम सुरू आहे. त्यासाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. सिंहस्थ 2003 दरम्यान उपजिल्हा रुग्णालयाच्या मागच्या बाजूला उभारलेले सांडपाणी प्रक्रिया केंद्र वेळोवेळी दुरुस्तीच्या नावाखाली बंद असते, तर अनेकदा त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधीही खर्च झाला आहे. मात्र, तरीदेखील ते केवळ नावापुरतेच उरले आहे. याबाबत आधी हरित लवादाने दंड ठोठावल्याने तात्पुरत्या स्वरूपाचे दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, आजही नदीपात्रात काळेशार सांडपाणी वाहताना नजरेस पडते. भुयारी गटरा योजना पूर्ण होईल आणि सांडपाण्याचे शुद्धीकरण सुरू होईल त्यास आणखी काही वर्षांचा कालावधी जाणार आहे. मात्र, आजच्या स्थितीला नगरपालिका प्रशासनाने नदीपात्रांकडे दुर्लक्ष केल्याने गोदावरीत घाण पाणी सोडण्याबरोबच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाजूस असलेल्या अहिल्या नदीपात्रात कचरा फेकला जात आहे. त्याच सोबत शहराच्या आजूबाजूस असलेल्या नाले, ओहोळांमध्ये कचरा टाकला जात आहे.

घाटांचे सुशोभीकरण अन‌् दुर्गंधीयुक्त पाणी

केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेतून येथे नदीपात्रांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. रिंग रोडलगत असलेले आहिल्या आणि गोदावरी घाट सजविण्यात आले आहेत. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, बाहेरून सौंदर्यीकरण झालेलेल्या नदीपात्रात मात्र मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, घाण पाणी पात्रात साेडले जात असल्याने गोदावरी नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. तसेच सिंहस्थात नऊ कोटी रुपये खर्च करून बांधलेले घाट आता कचरा डेपो झाले आहेत.

हेही वाचा :

Back to top button