INDvsAUS Test : भारताला नववा झटका, उमेश यादव बाद | पुढारी

INDvsAUS Test : भारताला नववा झटका, उमेश यादव बाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंदूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 109 धावांत गुंडाळल्यानंतर कांगारूंनी 197 धावां केल्या आणि पहिल्या डावात 88 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. त्यानंतर भारताने उपहारापूर्वी आपल्या दुस-या डावाला सुरुवात केली. सध्या टीम इंडियाची धावसंख्या 59 षटकात 9 बाद 163 असून संघाने 75 धावांची आघाडी घेतली आहे.

भारताला नववा धक्का

भारताला नववा धक्का उमेश यादवच्या रूपाने बसला. तो खाते न उघडता कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर झेलबाद झाला. लायनची ही सातवी विकेट होती.

चेतेश्वर पुजारा बाद

भारताला आठवा धक्का चेतेश्वर पुजाराच्या रूपाने बसला. तो 59 धावा करून नॅथन लायनच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद झाला. स्मिथने लेग स्लिपवर त्याचा एका हाताने झेल घेतला आणि पुजाराचा डाव संपवला.

भारताला सातवा धक्का

आर अश्विनच्या रूपाने भारताला सातवा धक्का बसला. त्याला नॅथन लायनने बाद केले. लायनचे हे पाचवे यश आहे. अश्विन 13 धावा करून एलबीडब्ल्यू आऊट झाला.

पुजाराचे अर्धशतक

चेतेश्वर पुजाराने 46 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे 35 वे अर्धशतक आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे 16 वे अर्धशतक आहे.

भारताला सहावा धक्का

भारताची आघाडी 30 धावांपर्यंत पोहचली असताना केएस भरतच्या (3) रूपाने संघाला सहावा धक्का बसला. नॅथन लायने त्याला आपल्या फिरकीने फसवून क्लीन बोल्ड केले.

भारताला पाचवा धक्का

भारताला 113 धावांवर पाचवा धक्का बसला. स्टार्कने श्रेयस अय्यरला ख्वाजकरवी झेलबाद केले. अय्यरने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 27 चेंडूत 26 धावा केल्या. तसेच चेतेश्वर पुजारासोबत त्याने पाचव्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली.

जडेजा बाद

भारताला दुसऱ्या डावात 30.5 व्या षटकात 78 धावांवर चौथा धक्का बसला. नॅथन लायनने रवींद्र जडेजाला (7) एलबीडब्ल्यू केले. जडेजाला सात धावा करता आल्या. लायनचे हे तिसरे यश आहे. या डावात त्याने जडेजाआधी रोहित शर्मा आणि शुभमन गिलला बाद केले.

कोहली तंबूत

22.4 व्या षटकात 54 धावसंख्येवर विराट कोहलीच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. मॅथ्यू कुहनेमनने त्याला 13 धावांवर तंबूत पाठवले. भारताने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून 69 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 88 धावांची आघाडी घेतली होती, त्यामुळे भारत अजूनही 19 धावांनी मागे आहे. सध्या चेतेश्वर पुजारा 33 आणि रवींद्र जडेजा 2 धावा करत क्रीजवर आहे.

तत्पूर्वी, ऑस्ट्रलियाने पहिल्या दिवशी आपले चार फलंदाज गमावून 156 धावा केल्या होत्या. सलामीवीर टॅ्रव्हिस हेडने 9, उस्मान ख्वाजाने 60, मार्नस लॅबूशेनने 31 आणि कर्णधार स्मिथने 26 धावांचे योगदान दिले होते. तर पीटर हँडस्कोम्ब (7) आणि कॅमेरून ग्रीन (6) ही जोडी नाबाद होती. आज ऑस्ट्रेलियाने चार विकेट्सवर 156 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांना सुरूवातीच्या एक तासात एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर अश्विनने या दिवशीचे भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने पीटर हँड्सकॉम्बला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. 98 चेंडूत 19 धावा करून तो बाद झाला. हँड्सकॉम्ब आणि ग्रीन यांनी 40 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ७१ व्या षटकात ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का बसला. उमेश यादवने कॅमेरून ग्रीनला पायचीत केले. त्याने ५७ चेंडूत २१ धावा केल्या. ७३ व्या षटकात उमेश यादवने मिचेल स्टार्कबी याला बाद केले. ७४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूत ऑस्ट्रलियाला आठवा धक्का बसला. अश्विनने अॅलेक्स कॅरी याला ३ धावांवर बाद केले. 75 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूत ऑस्ट्रेलियाची नववी विकेट पडली. उमेश यादवने टॉड मर्फीबला आऊट केले. त्याला एकही धाव करता आली नाही. या डावात रवींद्र जडेजाने 4 तर उमेश यादव आणि अश्विनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

पहिल्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजीत बिघाडी

डावाच्या पहिल्या दिवशी होळकर स्टेडियमवरील खेळपट्टीचा अंदाजच भारतीय फलंदाजांना आला नाही. या मालिकेत प्रथमच नाणेफेकीचा कौल कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि फलंदाजी स्वीकारली. भारताने सुरुवातही जोशात केली होती. मात्र, नंतर वेगाने धावा जमविण्याच्या नादात रोहितसह बहुतांश फलंदाज बाद होत गेले आणि ऑस्ट्रेलियाचे काम सोपे झाले. कुहेनमनला सीमारेषेबाहेर फेकून देण्याचे वेडे धाडस रोहितला नडले. अ‍ॅलेक्स कॅरीने मग चपळाईने यष्टिरक्षण करून भारताला पहिला धक्का दिला. तीन चौकार ठोकून 12 धावांवर भारतीय कर्णधराने तंबूचा रस्ता धरला. कर्णधार रोहित बाद झाल्यानंतर एकाही भारतीय फलंदाजाने खेळपट्टीवर पाय रोवून कांगारूंच्या गोलंदाजीचा मुकाबला करण्याची जिगर दाखविली नाही. मैदानावर हजेरी लावून तंबूत झटपट परतण्याची स्पर्धाच भारतीय फलंदाजांमध्ये लागली होती. भारताकडून शुभमन गिल 21, चेतेश्वर पुजारा 1, विराट कोहली 22, रवींद्र जडेजा 4, श्रेयस अय्यर 0, श्रीकर भरत 17, रविचंद्रन अश्विन 3, उमेश यादव 17 आणि मोहम्मद सिराज 0 हे सर्वच खेळाडू पटापट बाद झाले. अक्षर पटेल 12 धावांवर नाबाद राहिला. उमेश यादव याने दोन षटकार व एक चौकार ठोकून भारतीय धावसंख्येला थोडाफार आकार देण्याचा प्रयत्न केला. तथापि, तोपर्यंत खूप वेळ झाला होता. भारताच्या डावांत एकूण तीन षटकार आणि केवळ अकरा चौकार ठोकण्यात आले.

फिरकी त्रिकुटाची कमाल

ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहेनमनने नऊ षटकांत फक्त 16 धावा देऊन भारताचा निम्मा संघ कापून काढला. त्याला तेवढीच समर्थ साथ दिली ती नॅथन लायन याने. 11.2 षटकांत 35 धावांच्या मोबदल्यात त्याने 3 गडी टिपले, तर टॉड मर्फीने एक गडी तंबूत पाठवला. कुहेनमनने एवढा भेदक मारा केला की, त्याच्या गर्रकन वळणार्‍या चेंडूंचा सामना करताना भारतीय फलंदाजांची भंबेरी उडताना दिसत होती. श्रेयस अय्यर हे त्याचे नमुनेदार उदाहरण. कुहेनमनने टाकलेला चेंडू अय्यरचा बचाव भेदून केव्हा यष्ट्या उडवून गेल्या हे खुद्द अय्यरलाही पटकन लक्षात आले नाही.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांत लाजिरवाणे पराभव स्वीकारावे लागल्यानंतर स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटीत जोरदार उसळी घेतली आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी आपले चार फलंदाज गमावून 156 धावा केल्या. विशेष म्हणजे हे चारही फलंदाज रवींद्र जडेजाने टिपले. सलामीवीर टॅ्रव्हिस हेडने 9, उस्मान ख्वाजाने 60, मार्नस लॅबूशेनने 31 आणि कर्णधार स्मिथने 26 धावांचे योगदान दिले. पीटर हँडस्कोम्ब (7) आणि कॅमेरून ग्रीन (6) ही जोडी नाबाद आहे. जडेजाने 24 षटकांत 63 धावा मोजून चार गडी बाद केले. हा अपवाद वगळता भारताच्या अन्य कोणत्याही गोलंदाजाला यश मिळाले नाही.

Back to top button