नाशिक : अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव द्या – धनगर समाज युवा समिती | पुढारी

नाशिक : अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव द्या - धनगर समाज युवा समिती

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा 

देशभरात समाजपयोगी कार्ये करून ठसा उमटवणा-या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला होता. त्यामुळे अहिल्यादेवींचे स्मरण म्हणून अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करावे, अशी मागणी धनगर समाज युवा समितीने केली आहे. याबाबत नाशिकरोड येथील विभागीय उपायुक्त रमेश काळे यांना निवेदन देण्यात आले. नामकरण न झाल्यास धनगर समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य संपूर्ण देशाला परिचत आहे. त्यांनी देशात व राज्यात अनेक मंदिरे, बारव, समाजपयोगी वास्तू बांधल्या. अनेक वर्षे होऊनही या वास्तू अजूनही सुस्थितीत असून त्यांचा लाभ आजच्या काळातील लोकांनाही होत आहे. राजमाता अहिल्यादेवी यांचे कार्य पूर्ण भारतात आहे. त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला होता. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करावे. उत्तर प्रदेशमध्ये इलाहाबाद जिह्याचे नाव बदलून प्रयागराज तर फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या करण्यात आले. तसेच अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. असे निवेदनात नमूद करण्यात आले असून यावेळी यावेळी धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते रामदास भांड, सुनील ओढेकर, कैलास बुचडे, संजय वाघ, नितीन धानापुणे, अनिल बारगळ, प्रकाश लांडे, अनंता वाघ, अविनाश पाबळे, प्रदीप वाघ, शशिकांत चौधरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button