पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बेळगावात; सकाळी रोड शो, दुपारी सभा | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बेळगावात; सकाळी रोड शो, दुपारी सभा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी बेळगाव दौर्‍यावर येत असून, नव्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर किसान सन्मान योजनेच्या 13 व्या टप्प्यातील16 हजार कोटींच्या अनुदानाचे वितरणही पंतप्रधान बेळगावातूनच करणार आहेत. हे अनुदान थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर जमा होणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांची जुने बेळगावजवळ सभाही होणार आहे. या दौर्‍याची तयारी जोमाने सुरू आहे.

पंतप्रधान रोड शो करत सभास्थळी पोहोचणार आहेत. या ‘रोड शो’साठी सर्वाधिक खबरदारी घेतली जात आहे. रोड शो मार्गावरील व्यावसायिकांनी आपली वाहने रस्त्यावर लावू नयेत, अशी नोटीस पोलिस खात्याने बजावली आहे. शिवाय पाण्याची बाटली, कॅरीबॅग, पिशवी व इलेक्ट्रॉनिक वस्तू सभास्थळी नेण्यावर निर्बंध घातले आहेत.

पंतप्रधानांचा रोड शो सीपीएड मैदानापासून सुरू होऊन येडियुराप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथे सांगता होणार आहे. त्यामुळे सीपीएड मैदानापासून चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, शनीमंदिर, कपिलेश्वर ओव्हरब्रीज, रेणुका हॉटेल, एसपीएम रोड, बँक ऑफ इंडिया, कुलकर्णी गल्ली रोड, जुना पीबी रोड, धारवाड नाका, येडियुराप्पा मार्ग, बळ्ळारी नाला येथून मालिनी सिटी रोडवर येणार्‍या व्यापार्‍यांना नोटीस बजावली आहे.

नोटिसीत म्हटले आहे की, मोदींच्या रोड शोमुळे 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत दुकान, हॉटेल, बार अँड रेस्टॉरंट, गॅरेज व अन्य व्यापार्‍यांनी आस्थापना चालकांनी त्यांची वाहने (दुचाकी, सायकल, छकडी यासह अन्य वाहने) आपल्या आस्थापनासमोर लावू नयेत. वाहन आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

कार्यक्रमस्थळीही निर्बंध

‘रोड शो’ नंतर पंतप्रधान मोदींची सभा मालिनी सिटी येथे होणार आहे. ठिकाणीही कडक पोलिस बंदोबस्त राहणार असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. या ठिकाणी पाण्याची बाटली, पिशवी तसेच कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत आणण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे कोणीही हातामधून पाण्याची बाटली घेऊन प्रवेशाचा प्रयत्न करू नये. शिवाय सोबत आणलेली पिशवी अथवा अन्य साहित्य आपल्या वाहनात ठेवून यावे. मोबाईल वगळता कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आत सोडली जाणार नाही , असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कळवले आहे.

हेलिकॉप्टरच्या घिरट्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौर्‍याआधी विशेष सुरक्षा पथकाचे (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप – एसपीजी) अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत. शनिवारी दिवसभर शहरावरून एसपीजीच्या हेलिकॉप्टरची भिरभिर सुरू होती. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग कसे आणि कुठे करायचे, याची तालीम तसेच रोड शो चा मार्ग कसा आहे, याबाबत एसपीजीने शनिवारी दिवसभर पाहणी केली. त्यामुळे शहरावरून दिवसभरात सात ते आठवेळा हेलिकॉप्टरची भिरभिर दिसून आली. एसपीजीने आधी हेलिकॉप्टर सीपीएड मैदानावर उतरवले. त्यानंतर एपीएमसी रोडवरील केएसआरपीच्या मैदानावरही उतवरले. मात्र पंतप्रधानांचे लँडिंग नेमके कुठे होणार, याबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे.

Back to top button