Nashik Ozar : यतीन कदमांचे पुन्हा दुसऱ्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन | पुढारी

Nashik Ozar : यतीन कदमांचे पुन्हा दुसऱ्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा 
मुख्याधिकारी कार्यालयात हजर रहात नसल्याने विविध समस्यांबाबत चर्चा होत नाही म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी काल मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या रिकाम्या खुर्चीलाच समस्यांचे निवेदन चिकटून गांधीगीरी केली होती.  आज पुन्हा प्रत्यक्ष नगरपरिषद मुख्याधिकारी हजर पाहुन स्ट्रीट लाईट, घंटागाडी, बंद पडलेले बोअरवेल चालू करण्याबाबत मुख्याधिकारी किरण देशमुख यांना समस्या तातडीने सोडवण्यासाठी निवेदन देऊन लवकरात लवकर समस्यांचे निरसन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

निवेदनात त्यांनी ओझर शहरासह उपनगरांना सध्या विविध नागरी समस्यांनी ग्रासले आहे. ओझर शहरासह परिसरातील सर्व उपनगरातील अनेक ठिकानी स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून रात्रीच्या वेळी जेष्ठ नागरिकांसह महिला-भगिनींना रस्त्याने जाताना येताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांचे फावते आहे. स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. तरी ओझर नगरपरिषदने त्वरित कार्यवाही करून स्ट्रीट लाईट चालू करावे. तसेच ओझर शहरासह परिसरातील सर्व उपनगरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. घंटा गाडी वेळेवर येत नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. परिणामी दुर्गंधीत वाढ होत असून डासांचे प्रमाणही वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  त्याचप्रमाणे ओझरसह परिसरात असलेल्या बोअरवेल बंद पडलेल्या असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना वापरायला पाणी मिळत नसून त्यांची गैरसोय होत आहे. तरी नगरपरिषदने याची दखल घेऊन बोअरवेल मध्ये असलेल्या मोटर चालू कराव्या अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनाची दखल न घेतल्यास ओझर शहर भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी दिला.

हेही वाचा : 

Back to top button