जळगाव : चक्क…! प्रार्थनास्थळावर फडकला पाकिस्तानी ध्वज | पुढारी

जळगाव : चक्क...! प्रार्थनास्थळावर फडकला पाकिस्तानी ध्वज

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील विटनेर येथील एका प्रार्थनास्थळावर पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आल्याची संतापजनक घटना दि. 18 जानेवारी 2022 रोजी उघडकीस आली होती. पोलिसांना याबाबतची माहिती कळाल्यानंतर त्यांनी ध्वज ताब्यात घेतला होता. मात्र, याप्रकरणी तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल झाला नव्हता. हा प्रकार देशद्रोहात मोडला जाणारा असताना पोलिसांच्या एकूणच भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने विश्व हिंदू परीषद, बजरंग दलाचे जिल्हा कार्यकर्ता हेमंत गणेश गुरव (लोहारा, ता.पाचोरा) यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश एमआयडीसी पोलिसांना दिले आहेत.
जळगाव शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील विटनेर येथे एका प्रार्थनास्थळावर गोपाळ सुपडू कहार (नेरी, ता.जामनेर) यांनी पाकिस्तानच्या ध्वजासारखा ध्वज लावल्याची बाब उघडकीस आली होती. बुधवार, दि. 18 जानेवारी 2022 रोजी हा प्रकार समोर आल्यानंतर हिंदूतत्वादी कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते.  त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली होती. एमआयडीसी पोलिसांनी गोपाळ कहार यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्याला स्वप्न पडल्याचे सांगून प्रार्थनास्थळावर ध्वज नसल्याने तो लावण्याची आज्ञा झाल्याने आपण हा ध्वज लावल्याचे त्यांनी कबुली दिली. मात्र, असा ध्वज हा पाकिस्तानचा असतो, अशी आपल्याला कल्पनाही नसल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले होते.

हेही वाचा:

Back to top button