मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी राऊत नाशिकमध्ये : दादा भुसे यांचा निशाणा | पुढारी

मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी राऊत नाशिकमध्ये : दादा भुसे यांचा निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खासदार संजय राऊत यांनी केलेला, धमकी मिळाल्याचा आरोप हा केविलवाणा प्रसिद्धीचा प्रयत्न आहे. मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी ते नाशिकला येत असतील, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी राऊतांवर निशाणा साधला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कायदेशीर मांडणी केल्याने आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले. सर्वोच्च न्यायालयातही आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास ना. भुसे यांनी व्यक्त केला.

ना. भुसे यांनी गुरुवारी (दि. २३) नाशिकमध्ये महावितरणची आढावा बैठक घेतली. त्यानंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी माणसे फोडण्यासाठी एजंट नेमल्याचा आरोप केला होता. त्याकडे भुसे यांचे लक्ष वेधले असता, राऊतांची मला कीव येते. ते स्वत:च कदाचित मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी नाशिकला येत असतील, अशी टीका भुसे यांनी केली. राऊत यांच्या धमकी प्रकरणावर मुख्यमंत्री यांनी चाैकशीची घोषणा केली असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत त्यांना विचारले असता, लोकशाही प्रक्रियेत सर्वांनाच न्याय मागण्याचा अधिकार आहे. आपला देश घटना, नियम आणि कायद्यावर चालतो. न्यायालयामध्ये कायद्यानुसार न्यायनिवाडा होऊन आम्हाला न्याय मिळेल, असे भुसे म्हणाले. लोकशाही प्रक्रियेत संख्येला अधिक महत्त्व आहे. त्यानुसार खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची संख्या आमच्याकडे अधिक आहे. त्या आधारावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिल्याचे भुसे यांनी सांगितले.

नाफेडने कांदा खरेदी करावा : भुसे

कांद्याचे पडलेले दर ही वस्तुस्थिती असून किमान दीड ते २ हजार रुपयांपर्यंत भाव मिळायला हवा, अशी अपेक्षा दादा भुसे यांनी व्यक्त केली. पिकांचे भाव पडल्यानंतर केंद्र सरकार हस्तक्षेप योजनेच्या माध्यमातून खरेदी करते. त्याच धर्तीवर नाफेडमार्फत कांदा खरेदी करावा, अशी विनंती केंद्राला करणार असल्याचे भुसे म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button