पुणे : उन्हाचा चटका अन् लिंबूचा झटका | पुढारी

पुणे : उन्हाचा चटका अन् लिंबूचा झटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उन्हाच्या चटक्यामुळे होणारी जिवाची काहिली थांबविण्यासाठी पुणेकर सरबत, उसाचा रस याचा आधार घेतात. त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात लिंबाला मागणी वाढली आहे. अहमदनगर, सोलापूर भागातील लिंबांना चांगला भाव आला असून, दहा दिवसांत लिंबांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नगाची चार ते पाच रुपयांना विक्री सुरू आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबांना मागणी वाढली आहे. सद्यस्थितीत बाजारात अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून दररोज 15 ते 20 किलोंच्या एक हजार 200 ते दोन हजार गोण्यांची आवक होत आहे. एका गोणीला दर्जानुसार 300 ते 1300 रुपये भाव मिळत आहे. दहा दिवसांपूर्वी हीच आवक तीन हजार गोणी एवढी होती. मात्र, त्याचे दर 200 ते 300 रुपयांपर्यंत होते. लिंबांचे उत्पादन घटल्याने लिंबांची आवक निम्म्याने घटून दीड हजार गोण्यांवर आली आहे. मागणी वाढल्याने लिंबांचे भावात मोठी वाढ झाली असून, दहा दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात दहा रुपयांना पाच लिंबू मिळत होते, ते आता दोनच मिळत आहेत.

किरकोळ बाजारात एका नगाची 4 ते 5 रुपयांना विक्री
सरबतविक्रेते, रसवंतीगृहे, लिंबूविक्रेत्यांकडून मागणी

बाजारात लिंबांची आवक कमी होत असून, मागणी वाढल्यामुळे लिंबांच्या किंमतीत वाढ झाली आहे. लिंबाला उन्हाळ्यात मोठी मागणी असते. दरही तेजीत असतात. होळीनंतर लिंबांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

                                  – रोहन जाधव, लिंबू व्यापारी, मार्केट यार्ड

Back to top button