जळगाव, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत निवडून येऊन नंतर सत्ता स्थापनेसाठी युती तोडली हा मोठा विश्वास घात केला आहे. याची भरपाई त्यांना करावी लागणार आहे. त्यांचा पक्षही गेला आता पक्षाचे नावही गेले चिन्हही गेले. शिवाय आता यापुढे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
जळगाव शहरात शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास गिरीश महाजन यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी माध्यमांचे संवाद साधला ते म्हणाले, निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने जो निकाल दिला आहे तो नक्कीच न्यायपूर्ण असाच आहे. शिवसेनेचे ८० टक्के आमदार, खासदार आणि पदाधिकारी हे शिंदे गटाच्या बाजूने आहेत तर उद्धव ठाकरे यांच्याकडे २० टक्के देखील नेते नाहीत. त्यामुळे आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
राज्यात भाजप आणि शिंदे गटाने हिंदुत्वासाठी युती केली आहे. ही होती कुठल्याही सत्तेसाठी नाही. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली होती. बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. आयुष्यभर बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला कडाडून विरोध केला. मात्र, उद्धव यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराने काम केले आहे. शिवसेना हा केवळ पक्ष नाही ती एक विचारधारा आहे. त्यामुळे आता शिवसेना स्वतंत्र झाली असून राहिला आहे. तो फक्त ठाकरे गट. आता ठाकरेकडे पुढील काळात कोण राहते हे समजेलच. त्यांच्याकडील लोक आता खऱ्या शिवसेनेत परत येतील असेही गिरीश महाजन यांनी दावा केला.
पक्षाने पुण्यातील निवडणुकीची जबाबदारी माझ्यासोबत सोपवली आहे. एकंदीतच तेथील वातावरण पाहता, पुण्यातील पोट निवडणुकीत दोन्ही जागा भाजपच्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला आहे.