Nashik : तिसगावच्या कराटे कुटुंबावर शोककळा, काकासह पुतणे अपघातात ठार | पुढारी

Nashik : तिसगावच्या कराटे कुटुंबावर शोककळा, काकासह पुतणे अपघातात ठार

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

वणी-पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिसगाव (ता. दिंडोरी) येथील एकाच कुटुंबातील काका व दोन पुतणे असे तिघे जागीच ठार झाले आहेत. तीन कर्ते पुरुष ठार झाल्याने कराटे कुटुंबासह तिसगाववर शोककळा पसरली आहे.

मंगळवारी (ता.१४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वणी ते पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील बोराळे फाटा येथे वणीकडून पिंपळगाव बसवंतकडे भरधाव जाणाऱ्या वाहनाने तीसगांवहून वणीकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीचा चेंदामेंदा होत दुचाकीवरील निवृत्ती सखाराम कराटे (वय ५५, काका), केदू यशवंत कराटे (३५, पुतण्या), संतोष विष्णू कराटे (३३, पुतण्या, सर्व रा.
तिसगाव (ता. दिंडोरी) हे जागीच ठार झाले.

शेतमजुरीचे काम करणारे हे तिघे काका पुतणे वणी येथे आठवडे बाजारासाठी येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणले. रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अपघात करून पलायन करणाऱ्या वाहनाचा पोलिस शोध घेत आहे. वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

बोराळे फाटा ते तिसगाव फाटा या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहे. साखरेश्वर मंदिर ते बोराळे फाटयादरम्यान उताराचा रस्ता असल्याने व बोराळे फाट्यावर काहीसा वळणाचा रस्ता असल्याने अपघात होत आहे.  हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग व सिमेंट कॉक्रीटचा आहे, त्यामुळे या भागात अतिवेगामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण अधिक असल्याने बोराळे फाटा येथे गतिरोधक बसविण्याची मागणी तिसगाव व बोराळे येथील ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button