

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
चांदवड तालुका कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक येथील रेस्ट हाऊस येथे सोमवार (दि.१३) रोजी दु. १२ वा. घेण्यात येणार आहे. या बैठकीत चांदवड देवळा मतदार संघाचे माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहे.
या बैठकीत कांदा, द्राक्ष व शेतमालाचे बाजारभाव दैनंदिन घसरत असल्याने शेतकरी बांधवांचे प्रतिनिधीत्व म्हणुन यावर आंदोलन करणेबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत लाल कांद्याचे बाजारभावात दैनंदिन घसरण होतांना दिसून येत आहे. त्यामुळे शेतक-यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतक-यांमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच शेतक-यांवर उपासमारीची व आत्महत्या करण्याची वेळ या शासनाने आणलेली आहे. परंतु केंद्र शासन व राज्य शासन याकडे जाणीवपुर्वक डोळे बंद करुन कांदा उत्पादक शेतक-यांसाठी कोणतीही ठोस पाऊले उचलत नसल्याचे दिसत आहे. त्याकरीता आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. त्याकरीता कॉंग्रेस पक्षातर्फे या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष संजय दगुजी जाधव, नाशिक जिल्हा किसान सेल अध्यक्ष संपतराव वक्ते यांनी दिली. या बैठकीस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.