

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रांचे योगदान राहिले आहे. आता महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रावर काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या राज्यात अनेक उत्तम शैक्षणिक संस्था काम करत असून, त्यांच्या पाठीमागे सामान्य माणूस उभा आहे. हे राज्याचे एक वैशिष्टय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
शहरातील कालिदास कला मंदिरात आयाेजित मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या नागरी सत्काळ सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, डॉ. मो. स. गोसावी, आमदार हेमंत टकले, माणिक कोकाटे, ॲड. जयंत जायभावे, ॲड. अविनाश भिडे, ॲड. आशिष देशमुख, ॲड. भगवान साळुंखे, ॲड. सतीश देशमुख, ॲड. हेमंत धात्रक, ॲड. विलास लोणारी, डॉ. अभिमन्यू पवार, माजी आमदार जयवंत जाधव, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, डॉ. अविनाश धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
देशात नवीन शैक्षणिक धोरण आणले जात असून, त्यात काही नवीन बाबी समोर येत आहेत. काही प्रश्न उपस्थित होत असल्याने ते सर्वांनी एकत्र येऊन या धोरणातील चांगल्या गोष्टी घेण्यासाठी चर्चा करावी. आवश्यक त्या दुरुस्ती केल्या पाहिजे. बारामती शिक्षण संस्थेने ऑक्सफर्ड आणि आयबीएम या संस्थांशी सामंजस्य करार केले आहे. आगामी काळात मविप्रसारख्या मोठ्या संस्थेनेही करार केल्यास नाशिकमध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी नवीन पिढीने विज्ञानावर आधारित शिक्षणाची कास धरण्याची गरज असल्याचे खा. पवार यांनी सांगितले.
भारत हा शेतीप्रधान देश आहे. पूर्वी ३५ टक्के लोक शेती करत होते. आता ५६ टक्क्यांहून अधिक लोक शेती करत आहे. त्यामुळे शेतीवर अधिक बोजा वाढत आहे. याबाबतही विचार होणे आवश्यक असून, शिक्षणाच्या माध्यमातून शेती समृध्द होऊ शकते. त्यानुसार शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ दृष्टी द्यावी, असे आवाहन खा. पवार यांनी केले. दरम्यान, छगन भुजबळ यांनी भाषणादरम्यान केलेल्या शेरोशायरीला खा. पवारांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने सभागृहात हास्याचे फवारे उडाले.
शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये. शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाने एका ठरावीक चौकटीत काम केले पाहिजे. संस्थांनीही शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देऊन विकासाची नवनवीन दालने उघडण्याचा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला.
छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत मविप्रच्या थकीत अनुदानावर भाष्य करताना पालकमंत्री दादा भुसे यांना आपण दोघेही भु-भु असून, आपण आवाज उठविल्यास हा प्रश्न मार्गी लागेल असे सांगताच सभागृहात एक हास्यकल्लोळ झाला. पालकमंत्र्यांनीही हाच धागा पकडत थकीत अनुदानाप्रकरणी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा :