नाशिक : फायरबॉल खरेदीसाठी प्रशासनाचा पुन्हा आटापिटा | पुढारी

नाशिक : फायरबॉल खरेदीसाठी प्रशासनाचा पुन्हा आटापिटा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी तब्बल 89 लाख रुपयांच्या ‘फायरबॉल’ची केलेली खरेदी वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. आता अग्निशमन विभागाने रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनांच्या नावावर बाजारात अवघ्या 800 ते 1,500 रुपयांत मिळणार्‍या फायरबॉलसाठी सात हजार 80 रुपये प्रतिनगप्रमाणे 18.19 लाख रुपये खर्च करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा फायरबॉल प्रकरण पेटण्याची शक्यता आहे.

अशासकीय ठरावाचा आधार घेऊन दोन वर्षांपूर्वी तब्बल 89 लाखांचे 1,391 फायरबॉल खरेदीची प्रक्रिया तत्कालीन सत्तारूढ भाजपने पुढे रेटली होती. फायरबॉलच्या बाजारातील किमती न तपासता ही खरेदी करण्यात आली होती. बाजारात अशा प्रकारचे फायरबॉल 800 ते 1,500 रुपयांपर्यंत उपलब्ध असताना महापालिकेने निविदा काढताना एका फायरबॉलची किंमत सहा हजार 388 रुपये गृहीत धरली होती. काही अधिकारी, तत्कालीन नगरसेवक आणि ठेकेदाराच्या संगनमताने हा सारा प्रकार घडला होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर निविदा प्रक्रियेस स्थगितीचा बनावही रचला गेला. प्रत्यक्षात मागच्या दाराने फायरबॉलची खरेदी केली गेली. फायरबॉलसारख्या साधनांची आग विझवण्यासाठी कितपत उपयुक्तता आहे, याची कोणतीही पडताळणी न करता अग्निशमन विभागाने फायरबॉल खरेदीचा प्रस्ताव पुढे अंमलबजावणीत आणला होता. त्यावरून बराच काळ वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा महापालिकेच्या रुग्णालये, प्रसूतिगृहांतील अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची गरज असल्याचे कारण देत फायरबॉल खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाने पुढे रेटलाच नाही तर, प्रशासकीय राजवटीचा फायदा घेत महासभेवर 257 नग फायरबॉलच्या खरेदीसाठी 18.19 लाखांचा प्रस्ताव मंजूरदेखील केला आहे. त्यामुळे फायरबॉल प्रकरण पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

फायर ऑडिटचे निमित्त
फायरबॉल खरेदीसाठी अग्निशमन विभागाने मनपा रुग्णालये, प्रसूतिगृहांच्या फायर ऑडिटचे कारण दिले आहे. त्यासाठी 18.19 लाखांच्या फायरबॉल खरेदीचा प्रस्ताव महासभेवर मंजूरदेखील करण्यात आला आहे.

शासनाच्या जी. एम. पोर्टलवर नमूद दरानुसार फायरबॉल खरेदीसाठी 7,080 रुपये प्रतिनग दर निश्चित करण्यात आले आहेत. निविदा प्रक्रिया राबवून फायरबॉलची खरेदी केली जाईल. – संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा.

हेही वाचा:

Back to top button