लवंगी मिरची : हॅलो, हॅलो! | पुढारी

लवंगी मिरची : हॅलो, हॅलो!

अहो काय चाललंय काय? सकाळपासून तुमचा मला हा पाचवा फोन आहे गाडीचे इन्श्युरन्स करून घ्या म्हणून. मला माहिती आहे ना की माझ्या गाडीचे इन्श्युरन्स संपत आले आहे ते? माझी गाडी, त्याची काळजी मी घेणार, माझ्या जीवाला किंवा गाडीच्या जीवाला काही कमी जास्त झाले, तर मी पाहून घेईन ना? तुम्ही सारखा आग्रह करताय मला इन्श्युरन्स करून घ्या म्हणून. हे बरोबर नाही. काय म्हणताय, तारीख संपत आली आहे? पण, अजून पाच दिवस आहेत ना? शेवटच्या दिवसाच्या रात्रीपर्यंत माझ्या गाडीचा इन्श्युरन्स असतो. तुमचे आपले फोनवर फोन सुरूच आहेत? काय म्हणता, तुम्ही पहिल्यांदाच फोन केला आहे? मग, ते दुसर्‍या कंपनीचे असतील बहुतेक.अच्छा, तुमचेच सहकारी होते का? अच्छा, अच्छा ठीक आहे हो; पण फोन करणार्‍या सगळ्या महिलाच होत्या. हो, हो, मान्य आहे की एखाद्या महिलेने फोन केला आणि तोही मंजूळ स्वरात, तर पुरुषाला बरेच वाटते. ठीक आहे, बघतो मी.
काय सांगू मंडळी, या रोजच्या फोनला वैतागलोय मी आणि तुम्ही पण वैतागला असाल. थांबा, थांबा, फोन वाजतोय. हॅलो, नाही हो मला लोन नको आहे हो! काय म्हणता, दहा लाखांपर्यंत बिनव्याजी देणार. काय सांगताय काय? दहा लाख घेऊन मी करू काय? माझ्या मुलाबाळांची लग्नं झाली आहेत, घर बांधून झाले आहे. मला कशाला म्हणून पैसे नको आहेत. तुम्ही द्याल हो दहा लाख रुपये; पण मग मी ते कसे फेडायचे हे पण सांगा ना! माझं महिन्याचं उत्पन्न जेमतेम पंचवीस हजार रुपये. तुमच्या दहा लाखांच्या लोनचा हप्ता फेडायचा म्हणलं, तर मला किडनीच विकायला लागेल. काय म्हणताय? किडनी विकून टाकू? हो, तुमचे बरोबरच आहे म्हणा! कारण, देवाने माणसाला दोन किडन्या दिल्यात ना? एक शरीर चालू म्हणजे सक्रिय राहावे म्हणून आणि दुसरी विकण्यासाठी. ठेवा फोन. काही नको मला लोन वगैरे.
तर असं आहे मंडळी. कारण नसताना दिवसात पाच-सात फोन येतात, लोन पाहिजे का, हे विचारणारे.अतिशय गोड आवाजात लोन घ्या म्हणून आग्रह असतो. एखादी स्त्री विवाहित पुरुषाला नम— आवाजात बोलते म्हणलं की, त्याला आनंद होणारच. मान्य आहे. कारण, घरात आपल्याशी कुणी असं बोलत नाही ना? पण, मग एक दोन-चार फोन येईपर्यंत बरे वाटते, दिवसभर हे फोन उचलायचे की आपली काम करायची, काही समजत नाही. उदाहरण सांगतो. निवडणूक गोव्यामध्ये होते, मी राहतो कोल्हापुरात, त्या निवडणुकाशी माझा तसा थेट काही संबंध नाही; पण रोज दिवसातून दोन-तीन फोन यायचे अरविंद केजरीवाल च्या रेकॉर्ड केलेल्या आवाजात. काही समजत नाही, काय करतात? कुठून आपले नंबर मिळतात? म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात ना त्याचा चमत्कार आहे हा सगळा!
तुम्ही एखादी प्रॉपर्टी नुसती पाहायला जरी गेलात, तरी त्या गावातील सगळ्या ब—ोकर्सना खबर लागते. कारण, तुमचे लोकेशन त्यांना कळते. मग, त्यांना कळतं की, याच्याकडे काही पैसा आहे आणि हा कुठेतरी गुंतवणूक करण्यामध्ये इच्छुक आहे, की लगेच ते सुरू करतात तुम्हाला फोन करायला. क्रेडिट कार्डचे वेगळे फोन, इन्श्युरन्सचे फोन, लोन पाहिजे का म्हणून फोन, हॉटेलवाल्यांचे फोन, कंपन्यांचे फोन, नुसता वैताग येतो .परवा असाच एक फोन आला हेल्थ पॉलिसी घ्यायची का? मी आपलं सहज हो म्हणालो, तर लगेच त्यांनी सांगितलं की, तुम्ही मेलात तर तुमच्या घरच्यांना एक कोटी रुपये मिळतील. मेलात तर वगैरे नाही, शब्द वेगळे होते; परंतु अर्थ तोच होता ना! मी साफ सांगितलं की, मी 87 वर्षांचा आहे आणि तुमच्या कंपनीने मला पॉलिसी दिली, तर तुम्हाला हमखास तोटा होणार. त्यापेक्षा मी पॉलिसी न घेतलेली बरी आणि तुम्ही मला न दिलेली बरी!

Back to top button