नाशिक : ८९४ बेघरांच्या निवाऱ्यासाठी शासनाला प्रस्ताव | पुढारी

नाशिक : ८९४ बेघरांच्या निवाऱ्यासाठी शासनाला प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बेघरांच्या सर्वेक्षणात नाेंद झालेल्या ८९४ बेघरांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक महापालिकेच्या मालकीच्या ४ जागांवर एकूण ६४९ बेघर क्षमतेचा सविस्तर प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी शासनास पाठविण्यात आला आहे. अशाप्रकारे बेघरांना निवारा केंद्र उपलब्ध करून देणारी नाशिक महापालिका राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे.

नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात ‘दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका’ अभियानांतर्गत ‘शहरी बेघरांना निवारा’ या घटकाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. ४) सेवानिवृत्त सनदी अधिकारी उज्ज्वल उके यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समिती नाशिकमध्ये आली होती. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उज्ज्वल उके आणि समिती सदस्य महेश कांबळे यांचे मनपा मुख्यालयात स्वागत केले. यावेळी शहर प्रकल्प अधिकारी तथा उपआयुक्त करुणा डहाळे यांनी शहरी बेघर निवारा या घटकाचे सादरीकरण केले. आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी नाशिक मनपाकडून उभारल्या जाणाऱ्या बेघर निवारा केंद्राची माहिती देण्याबरोबरच मनपाच्या रुग्णालयांमध्ये बेघरांवर उपचार केले जातील, त्यांना तिथे समुपदेशन तसेच मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल, अशी माहिती दिली. तसेच बेघरांचे रेशनकार्ड काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान, त्र्यंबकेश्वर संचलित तपोवन येथील स्वामी विवेकानंद बेघर निवारा केंद्राचे स्वामी विश्वरूपानंद यांनी, बेघरांच्या आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकला. आतापर्यंत २० जणांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केले. काही बेघर गंभीर आजारी होते. ते वैद्यकीय उपचारांनी बरे झाल्याचे सांगितले. त्यातील रंगनाथन अय्यर यांनी बेघराची व्यथा सांगून उपचारानंतर कंपनीमध्ये जनरल मॅनेजर पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. नाशिक शहराचा वेग वाढतोय. त्यामुळे वापरात नसलेल्या इमारतींचा निवारा केंद्र म्हणून उपयोग व्हावा. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसे नियोजन व्हावे, अशी विनंती स्वामी विश्वरूपानंद यांनी केली.

यावेळी नगर परिषद प्रशासन संचालनालय उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी बेघरांचे बचत गट तयार करण्याची सूचना केली. ब्रिजेश आर्य यांनी बेघरांचे पुन्हा सर्वेक्षण करणे आणि दोन रिकव्हरी सेंटर उभारण्याच्या सूचना केल्या. राज्य निवारा समिती सदस्य डॉ. प्रमिला जरग यांनी मनपाच्या सादरीकरणावर समाधान व्यक्त केले. बैठकीला ब्रिजेश आर्य आणि प्रमिला जरग हे ऑनलाइन उपस्थित होते. तसेच उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. राठोड, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना कुटे, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, राज्य अभियान व्यवस्थापक रवींद्र जाधव, प्रसादराजे भोसले, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे संदीप कुयटे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, डे-एनयूएलएम विभागाचे रंजना शिंदे, पल्लवी वक्ते, मनोज धामणे, संतोष निकम, संदीप भोसले आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button