पुणे : साबळेवाडीला गौण खनिजाचे अवैध उत्खनन ; डोंगरात चालू केले खडीक्रशर | पुढारी

पुणे : साबळेवाडीला गौण खनिजाचे अवैध उत्खनन ; डोंगरात चालू केले खडीक्रशर

बारामती : पुढारी वृत्तसेवा : साबळेवाडी गावच्या हद्दीत शेतकर्‍यांना हाताशी धरून महसूल खात्याची कोणतीही परवानगी न घेता कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाचे उत्खनन केले आहे. रस्त्याची कामे घेणार्‍या या ठेकेदाराने थेट मोबाईल खडीक्रशर सुरू करून त्यातून दगड, खडी काढून वापरली आहे. सदर ठेकेदार हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मर्जीतील असल्याने महसूल विभागाने या कारवाईबाबत सध्या तरी बोटचेपे धोरण अवलंबले आहे.

साबळेवाडीच्या गावच्या हद्दीत एका गटामध्ये हे उत्खनन केले आहे. त्यासाठी शेततळे खोदत आहे, अशी बतावणी करा, असेही या ठेकेदाराने शेतकर्‍यांना सांगितले; परंतु त्यासाठीसुद्धा कोणतीही परवानगी घेतलेली नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना सोबत घेत कारवाईची मागणी केली. महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांच्या समोरून हायवा, डंपर, ट्रक, ट्रॅक्टर – ट्रेलर ही वाहने पसार झाली. परंतु, मोबाईल क्रशर, जेसीबी अशी अवजड वाहने मात्र हलवता आली नाहीत. ठेकेदाराने या भागात एका रस्त्याचे काम घेतले आहे. त्यासाठी 11 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्याठिकाणी लागणारी खडी, मुरूम हे साहित्य या ठिकाणाहून काढून नेले जात आहे. वास्तविक या ठेकेदाराकडे खानपट्टा नाही. ज्या जमिनीत हे काम सुरू आहे, तेथील अकृषिक परवाना नाही. प्रदूषण महामंडळाचे प्रमाणपत्र नाही. महसूल खात्याकडे रॉयल्टीपोटी एक रुपयाही भरलेला नाही. खडी क्रशर सुरू करण्याचा परवाना मिळविलेला नाही, तरीही रात्रंदिवस येथून गौण खनिजाचे उत्खनन केले जात आहे. धवडे यांनी साबळेवाडीचे सरपंच, ग्रामसेवक, गावकामगार तलाठी, मंडल अधिकारी यांना सोबत घेत येथे कारवाई करण्यासाठी भाग पाडले. फौजदारी गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना केवळ पंचनामा करण्यात आला.

पोलिस पाटील हनुमंत गोलांडे यांच्यासह सरपंच गणेश शिंदे व अन्य ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार गट क्रमांक 138 मध्ये सागर महादेव निचाळ यांच्या 91 आर क्षेत्रात अंदाजे 4500 ब—ास, शेखर दादासो निचाळ यांच्या 1. 81 आर क्षेत्रामध्ये 5 हजार ब—ास खोदाई झाली आहे. 600 ब—ास खडी काढली गेली आहे. मोबाईल क्रशर, महिंद्रा बोलेरो अशी वाहने या ठिकाणी आढळली. येथील मशिनरी डी. पी. जगताप या ठेकेदाराकडील असल्याचे जबाबात म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या जवळचे ठेकेदार डी. पी. जगताप यांची ही मशिनरी असल्याचे शेतकर्‍यांनी जबाबात म्हटले आहे. त्यांनी रस्त्याच्या कामासाठी ही अवैध खोदाई करत खडीक्रशर सुरू केले आहे. घटनास्थळाचे व्हिडीओ चित्रीकरण व छायाचित्रे काढली आहेत. प्रांत, तहसीलदार व महसूलच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी या कामी त्यांना सहकार्य केले. गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पालकमंत्री, महसूल मंत्री, प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे दाद मागणार आहे.
                                                      -पोपट धवडे, माहिती अधिकार कार्यकर्ते

ग्रामपंचायतीची परवानगी नाही
या ठिकाणी होत असलेल्या गौण खनिज उत्खननासाठी, क्रशरसाठी ग्रामपंचायतीने कोणतीही परवानगी दिलेली नाही किंवा परवानगीसंबंधी आम्हाला कोणतेही पत्र दिले नसल्याचे सरपंच जी. सी. शिंदे व ग्रामसेवक आर. एन. म्हात्रे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

Back to top button