धुळे : महापौरपदी प्रतिभाताई चौधरींच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा | पुढारी

धुळे : महापौरपदी प्रतिभाताई चौधरींच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

धुळे; पुढारी वृत्तसेवा – धुळ्याच्या महापौर पदावर भाजपच्या प्रतिभाताई चौधरी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे चित्र आज (दि. ४) स्पष्ट झाले आहे. विरोधी गटाकडून उमेदवाराने अर्ज दाखल झाला नाही. त्‍यामुळे महापौरपदाच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. तसेच स्थायी समिती सभापतीपदासाठी किरण कुलेवार यांची देखील बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे यांनी राजीनामा दिल्यानंतर महापौर पदासाठी मोठी चुरस होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. धुळे महापालिकेवर भाजपची एक हाती सत्ता असली तरी या पक्षाच्या नगरसेवकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्यामुळे या महापौरपदाच्या निवडीत दगा फटका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्याचबरोबर भाजपचे बहुमत असून देखील नगरसेवकांना सहलीला पाठवण्यात आल्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. मात्र या शक्यतेला शनिवारी ( दि. ४) पूर्णविराम मिळाला.

महापौरपदासाठी प्रतिभाताई चौधरी तर स्थायी समितीच्या सभापती पदासाठी किरण कुलेवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. विरोधी गटाकडून उमेदवारी दाखल करण्याच्या चर्चा होत्या. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे  महापौर आणि स्थायी समिती सभापती पदाची निवड केवळ औपचारिकता उरली आहे. या संदर्भात ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत हा निर्णय होणार आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी सारिका अग्रवाल आणि उपसभापती पदासाठी विमलबाई गोपीचंद पाटील यांच्या विरोधात अर्ज आला नाही. त्यामुळे या दोन्ही पदांची निवड देखील बिनविरोध होणार असल्याचे चित्र आहे.

महापौर स्थायी समिती सभापती तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी महापौर प्रदीप करपे, जयश्री अहिरराव तसेच विनोद मोराणकर, ओमप्रकाश अग्रवाल, कमलाकर अहिरराव, गजेंद्र अंपळकर, प्रवीण अग्रवाल, राकेश कुलेवार, बबन थोरात, शशी मोगलाईकर, चंद्रकांत गुजराती यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

हेही वाचा : 

Back to top button