Nashik : माणसामध्ये आता भावभावनाच निर्माण होत नाहीत, नाट्यप्रयोगावरील चर्चासत्रात विचारमंथन | पुढारी

Nashik : माणसामध्ये आता भावभावनाच निर्माण होत नाहीत, नाट्यप्रयोगावरील चर्चासत्रात विचारमंथन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भांडवलशाहीमुळे माणसाचे वस्तुकरण झाले आहे. त्यामुळे माणसांमध्ये आता भावभावनाच निर्माण होत नाहीत. मानसिक आजार ही भविष्यातील महत्त्वाची समस्या राहणार आहे. आज त्याची जाणीव माणसाला नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले.

सोशल नेटवर्किंग फोरम आणि सपान आयोजित मानसरंग प्रकल्प अंतर्गत नाट्यप्रयोगावरील चर्चासत्रात परशुराम साइखेडकर नाट्यगृहात अध्यक्षपदावरून पाठारे बोलत होते. व्यासपीठावर डॉ. मोहन आगाशे, डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. उमेश नागापूरकर, डॉ. शिरीष सुळे, विवेक गरुड, प्रेमनाथ सोनवणे, माधव पळशीकर उपस्थित होते. डॉ. आगाशे म्हणाले, मन आणि त्याचे कारभार कसे चालतात, तर त्याचे दोन प्रवास असतात. एक आतला आणि एक बाहेरचा. बाहेरचा प्रवास सर्वांना दिसतो, आतला प्रवास कुणालाच दिसत नाही. त्याची उत्तरे आयुष्यात प्रत्येकाला शोधावी लागतात. मानसिक आजार आणि मानसिक आरोग्य हे वेगळे घटक नाहीत. माणसाला आयुष्य हे कुटुंब, समाज यांच्याबरोबर व्यतीत करावे लागते. त्याचा परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर होतो. त्याचा प्रवास कोणत्याही पुस्तकात नसतो आणि आयुष्य शास्त्रीय पुस्तक नसल्याचे विचार डॉ. आगाशे यांनी मांडले. डॉ. शिरीष सुळे म्हणाले की, माणसाची मन:स्थिती बिघडायला काय कारण असते? त्याच्या लहानपणी घडलेल्या गोष्टींचा परिणाम भविष्यावर होत असतो. तो मानसिक आजार नाही. तो व्यक्त होण्याचा स्वभाव असतो.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेली ‘परिवर्तन’ संस्था मानसिक आरोग्यावर काम करते. संस्थेच्या ‘मानसरंग प्रकल्प’ अंतर्गत अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित आणि श्रीपाद देशपांडे लिखित ‘रंगीत संगीत गोंधळ’, क्षितीश दाते दिग्दर्शित आणि ओमकार गोखले लिखित ‘न केलेल्या नोंदी’ व सचिन शिंदे दिग्दर्शित आणि दत्ता पाटील लिखित ‘तो राजहंस एक’ नाटकांचे प्रयोग झाले. या तिन्ही नाटकांना डॉ. हमीद दाभोलकर, अतुल पेठे, डॉ. मोहन आगाशे, चंद्रशेखर फणसळकर, अश्विनी जोशी यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा :

Back to top button