पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं उपमुख्यमंत्र्याचं आश्वासन; तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम | पुढारी

पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं उपमुख्यमंत्र्याचं आश्वासन; तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम

पुणे : राज्यात यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी परीक्षा घेण्याचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या दरम्यान भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. त्यावर आज कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. मात्र जोपर्यंत कॅबिनेटमध्ये ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन सुरू आहे. यूपीएससीच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम या वर्षापासून लागू न करता तो 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. शहरातील अलका टॉकीज चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन होत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या 13 जानेवारीला देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आज पुन्हा एकदा एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर हे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित आहे.

रोहित पवार यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी नव्या वर्णनात्मक पद्धतीचा अभ्यासक्रम 2025 नंतर लागू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांच्या याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले असून त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, नव्या वर्णनात्मक पद्धतीचा अभ्यासक्रम 2025 नंतर लागू करावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या चालू वर्षीपासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याचा मोठा फटका राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. म्हणूनच हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांच्यासमोर ही मागणी केली आहे. या संदर्भात राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. कारण हे सर्व विद्यार्थी संभ्रमात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीसुद्धा या संदर्भात लक्ष घातलं असून मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोलले आहेत. एमपीएससीने जी टंकलेखकाची जाहिरात काढली, त्या जाहिरातीमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. जर एक उमेदवार सर्व विभागांसाठी परीक्षा देत असेल तर विभागवार त्याची गुणवत्ता यादी जाहीर व्हायला हवी, तेव्हाच मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळेल. अपेक्षा आहे की, सर्वसामान्य युवकांसाठी महाराष्ट्र सरकार लवकर निर्णय घेईल.

Back to top button