नाशिक पदवीधर निवडणूक : ‘त्या’मुळे 18 हजार मतदार राहिले वंचित ? | पुढारी

नाशिक पदवीधर निवडणूक : ‘त्या’मुळे 18 हजार मतदार राहिले वंचित ?

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना गैरसोयींचा सामना करावा लागला. संगमेश्वरात मतदान केंद्राचा संदेश असताना प्रत्यक्षात कॅम्पातील सोमवार बाजार शाळेत केंद्र निघाले. याशिवाय एका वेगळ्याच प्रकारामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याचा दावा होत आहे. ‘पदवीधर’साठी शैक्षणिक संस्थास्तरावर मतदार नोंदणी अभियान राबविले गेले. त्या अंतर्गत संस्थेच्या प्रतिनिधींकडे पदवीधरांनी आपापली कागदपत्रे सादर केली होती. परंतु, त्यातून घात झाल्याचा सूर उमटत आहे. 35 वर्षांत प्रथमच ‘पदवीधर’साठी मतदान न करू शकलेले अनिल निकम (दाभाडी) यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत या प्रकाराला वाचा फोडली. एका मोठ्या संस्थाचालकाने मतदार नोंदणी केली. त्यांच्या कार्यालयात विश्वासाने अर्ज जमा केले. परंतु, त्यांनी ते निवडणूक शाखेकडे सुपूर्द केले नाहीत, त्यामुळे किमान 18 ते 19 हजार मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

देवळ्यात 1,247 मतदारांनी बजावला हक्क
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी देवळा तालुक्यात 52.13 टक्के मतदान झाले. 2,392 पैकी 1,247 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा देवळा येथे दोन, तर उमराणे येथे एक अशा तीन मतदान केंद्रांमध्ये शांततेत मतदान झाले. त्यात येथील पहिल्या मतदान केंद्रात 1000 पैकी 622 (62.20 टक्के), दुसर्‍या केंद्रात 1,059 पैकी 458 (43.25 टक्के) व उमराणे मतदान केंद्रात 333 पैकी 167 (50.15 टक्के) असे एकत्रित सरासरी 52.13 टक्के मतदान झाले. 988 पुरुष व 259 महिला पदविधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 16 उमेदवार व शेवटचा ‘नोटा’ पर्याय अशा 17 रकान्यांची अडीच फुटांची मतपत्रिका मतदारांच्या चर्चेचा विषय ठरली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. याठिकाणी महाविकास आघाडी, भाजप आदींसह इतर उमेदवारांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

देवळा : येथे मतदान केल्याची खूण दाखविताना भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर.(छाया : सोमनाथ जगताप)

बागलाणमध्ये 49.55 टक्के मतदान

सटाणा तालुक्यात पदवीधर मतदार संघासाठी सरासरी 49.55 टक्के मतदान झाले. 5,217 पैकी 2,585 मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक 58.78 टक्के मतदान सटाणा शहरातील एका केंद्रात, तर सगळ्यात कमी 41.57 टक्के मतदान डांगसौंदाणे केंद्रात झाले.
बागलाण तालुक्यात नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी 5,217 मतदारांची नोंदणी झाली होती. त्यात 3,729 पुरुष, तर 1,488 स्त्रिया होत्या. तालुक्यात मतदानासाठी एकूण नऊ मतदान केंद्रांची निर्मिती झाली होती. सकाळी 8ला मतदानास प्रारंभ झाला. 4 पर्यंत सुरळीत मतदान झाले.

केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी अशी…
विरगाव : 49.28, डांगसौंदाणे: 41.57, मुल्हेर : 46.11, जायखेडा : 42.27, नामपूर: 48.82, सटाणा : 48.19, सटाणा : 58.78, सटाणा : 52.41, ब्राह्मणगाव 43.04.

हेही वाचा:

Back to top button