तरुणाच्या खूनप्रकरणी तिघे संशयित ताब्यात; जिरेगाव हद्दीत आढळला होता मृतदेह | पुढारी

तरुणाच्या खूनप्रकरणी तिघे संशयित ताब्यात; जिरेगाव हद्दीत आढळला होता मृतदेह

कुरकुंभ(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : बारामती येथील एका तरुणाचा खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह दौंड तालुक्यातील जिरेगाव हद्दीत आढळून आला होता. रविवारी (दि. 29) सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. या खून प्रकरणात कुरकुंभमधील तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तिघांकडे अधिक चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांचेकडील माहितीमध्ये विसंगती आढळून आली. विश्वासात घेऊन चौकशी केली असता दारू पिऊन झालेल्या वादातून व पैशाच्या आमिषातून त्यांनी हा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.

प्रफुल्ल ऊर्फ मोनू राजेंद्र बारवकर (वय 26, रा. खंडोबानगर, मोरगाव रोड बारामती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. किशोर ऊर्फ मोन्या सोमनाथ खंडाळे (वय 23), शुभम ऊर्फ बाबा उध्दव कांबळे (वय 23), गणुजी ऊर्फ आबा रमेश खंडाळे (वय 26, सर्व रा. कुरकुंभ, ता. दौंड) अशी अटक केलेल्या संशयिताचे नावे आहेत.

प्रफुल्ल बारवकर याचा खून जिरेगाव हद्दीत केला की अन्य ठिकाणी असा प्रश्न होता. तपासादरम्यान प्रफुल्ल याचा कुरकुंभ घाटाच्या परिसरात खून करून त्याचा मृतदेह जिरेगाव-भोळोबावाडी रस्त्यालगत आणून टाकल्याचे निष्पन्न झाले. तिघांना पुढील तपासासाठी दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, पोलिस उपअधीक्षक राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. कुरकुंभ पोलिस, दौंड पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांचा या कारवाईत समावेश होता.

घरावर स्लॅब टाकण्याचे प्रफुल्लचे स्वप्न अपूर्ण
प्रफुल्ल बारवकर हा खेड (ता. कर्जत, जि. अहमदनगर)- भिगवण रस्त्यावरील एका पेट्रोलपंपावर सुपरवायझर म्हणून कामाला होता. तो रोज घर ते काम अशी ये-जा करीत असे. घरावर स्लॅब टाकायचा असल्याने घटनेच्या दिवशी प्रफुल्ल याने काष्टी येथील बहिणीकडून 30 हजार रुपये घेऊन तो दौंडला आला होता. गाडी भेटली तर घरी येईल नाहीतर पांढरेवाडीत मामाकडे घरी जाईन, असे फोनवरून घरी सांगितले होते. मात्र, त्याचा खून झाल्याने त्याचे स्लॅब टाकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

Back to top button