नाशिक : खासगी सावकारीबाबत पोलिस, उपनिबंधकांची चुप्पी | पुढारी

नाशिक : खासगी सावकारीबाबत पोलिस, उपनिबंधकांची चुप्पी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नियमबाह्य पद्धतीने चक्रव्याढ व्याजदराने कर्ज देऊन खासगी सावकार मुद्दलाच्या कित्येक पटीने व्याज वसूल करीत कर्जदारांचे आर्थिक शोषण करत आहे. सावकारांच्या दमदाटी, मुद्दलापेक्षाही जास्त पैसे देऊनही कर्जाचा विळखा सुटत नसल्याने किंवा सावकारांच्या ताब्यात स्थावर मालमत्ता जात असल्याने अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. या सावकारांवर कायद्याचा धाक नसल्याने त्यांची मनमानी कजर्दारांना फाशी घेण्यास प्रवृत्त करत असल्याचे दिसत आहे. पोलिस यंत्रणा व उपनिबंधक तक्रारींच्या प्रतीक्षेत असतात, तर कारवाई होत नसल्याने दुसरीकडे सावकारांचे फावले असून, ते नियमबाह्य कर्जवितरण करून मनमानी पद्धतीने कर्जवसुली करत आहेत.

शहरातील सातपूर येथे खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून पित्यासह दोन कर्त्या मुलांनी रविवारी (दि.29) गळफास घेतला. या आधीही पाथर्डी फाटा येथे सावकाराच्या वसुलीला घाबरून गौरव व नेहा जगताप यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्या. तर सातपूरमधील 30 वर्षीय युवकाने 10 हजार रुपयांच्या कर्जापायी आत्महत्या केली, तर म्हसरूळ मध्ये ट्रकचालकानेही सावकारांच्या तगाद्यामुळे त्रस्त होऊन ट्रक टर्मिनसमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनांमध्ये आत्महत्या करणार्‍यांनी खासगी सावकारांंची नावे लिहून ठेवल्याने त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे. मात्र, याव्यतिरिक्त इतरांनीही खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्या तरी त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर न आल्याने संबंधित खासगी सावकार मोकाट असल्याचे बोलले जाते. खासगी सावकारांकडून शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांची लूट होऊ नये, यासाठी राज्य सरकारने 2014 मध्ये खासगी सावकारी कायद्यात सुधारणा केली. सावकारी कर्जाचे व्याजदर कमी करून त्याच्या वसुलीबाबतही नियमावली जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र खासगी सावकारांकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जातात. सरळ व्याजाऐवजी चक्रवाढ दराने व्याजाची आकारणी करून कर्जदारांची लूट करणारे सावकार शहरात फोफावले आहेत. कर्जदारांची तक्रार पोलिस ठाण्यात किंवा उपनिबंधकांपर्यंत पोहोचल्याशिवाय बेकायदेशीर सावकारी समोर येत नसल्याचेही वास्तव आहे. मात्र, सावकारी करणार्‍यांची दहशत असल्याने कर्जदार अन्याय सहन करतो, मात्र त्यांच्याविरोधात तक्रार देण्यास धजावत नसल्याचेही चित्र आहे. कागदोपत्री 12 ते 15 टक्के व्याजदर दाखवला जातो. मात्र, प्रत्यक्षात दर महिन्याला 10 ते 30 टक्के व्याजदराने वसुली केली जाते. संबंधित सावकारांवरील गुन्हे सिद्ध होणे किंवा त्यांना शिक्षा होण्याचे प्रमाणही फारच कमी आहे. अनेकदा सावकारांच्या दमदाटीला घाबरून तक्रारदारच तक्रार मागे घेतात. सावकार कोर्‍या कागदपत्रांवर कर्जदारांच्या स्वाक्षर्‍या घेतात, त्यामुळे सर्व व्यवहार संमतीने झाल्याचे दाखवले जाते. अनेकदा न्यायालयात ठोस पुरावे सादर करण्यातही कर्जदार अपयशी ठरतात. त्यामुळे सावकार मोकाट सुटतात. सर्वसामान्यांची लूट करणार्‍या सावकारांना चाप लावण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अन्यथा खासगी सावकारीच्या फासामुळे भविष्यात अनेकांचा बळी जाण्याची भीतीही नाकारता येत नाही.

सावकाराकडून कर्ज घेताना घ्या ही काळजी….
* शेतकर्‍यांनी सहकारी संस्था, सहकारी बँका किंवा राष्ट्रीयीकृत बँकेकडूनच कर्ज घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आलीच तर परवानाधारक सावकाराकडूनच कर्ज घ्यावे.
* सावकारांनी कर्जावर आकारावयाचे व्याजाचे दर शासनाने ठरवून दिलेले असतात. त्यामुळे कर्जदारांनी व्याजदर माहिती करून घ्यावेत.
* कर्जाची परतफेड नियमितपणे आणि वेळेत करावी.
* कोणत्याही कागदपत्रांवर वाचल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय स्वाक्षरी करू नयेत. कोर्‍या कागदावर सही करू नये.
* सावकारास परत केलेल्या कर्ज रकमेची पावती घ्यावी.
* सावकाराने हिशेबाशिवाय अन्य रकमेची मागणी केल्यास ती देऊ नये.
* सावकाराकडून त्रास होत असल्यास सहकार खाते किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी.

* खासगी सावकारांवर जिल्हा उपनिबंधकांचे नियंत्रण असते. तक्रारी आल्यास संबंधित खासगी सावकारांची चौकशी करणे, दोषींचे परवाने रद्द करणे, कागदपत्रांची तपासणी, दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार उपनिबंधकांना आहेत. या अधिकारांचा वापर मात्र अपवादानेच होत असल्याचे चित्र आहे.

* बहुतांश खासगी सावकार राजकीय पक्षांशी किंवा नेत्यांशी संबंधित असतात. कर्जवसुलीसाठी गुंडांच्या टोळ्या असतात. व्याजाबद्दल तक्रार केल्यास कर्जदाराला दमदाटी केली जाते. कर्ज-व्याज देण्यास टाळाटाळ केल्यास गुंडांकडून अपहरण, मारहाण करून पैसे वसूल केले जातात. त्यामुळे खासगी सावकारांविरोधात तक्रारी दाखल करण्यास कर्जदार घाबरतात.

सावकारांकडून त्रास होत असल्यास संबंधित कर्जदाराने जवळील पोलिस ठाण्यात किंवा पोलिस आयुक्तालयात तक्रार करावी. तक्रारीची शहानिशा करून कारवाई केली जाईल. – अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त.

खासगी सावकारीचे हे आहेत नियम…
केवळ नोंदणीकृत सावकारांनीच कर्ज द्यावे.
मुद्दल रकमेपेक्षा अधिक व्याज वसूल करू नये.
तारण कर्जासाठी वार्षिक 12 टक्के व्याजाची आकारणी करावी, तर विनातारण कर्जासाठी वार्षिक 15 टक्के व्याजदराने कर्ज द्यावे.
दर तीन महिन्यांनी सावकाराने कर्जदारास वसूल केलेली रक्कम आणि मुद्दल याची पावती देणे बंधनकारक आहे.

हेही वाचा:

Back to top button