नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार

निफाड, पुढारी वृत्तसेवा : म्हाळसाकोरा येथे शेतीतील द्राक्ष बागेचे काम आटपून घरी परतणाऱ्या आईच्या हातातील पाच वर्षाच्या चिमुकल्यास बिबट्याने ओढत जखमी केले. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला असून मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी निफाड येथे पाठविण्यात आला. रोहन हिरामण ठाकरे (वय ५) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, म्हाळसाकोरे येथे सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक येथील शेतमजूर द्राक्ष कामासाठी मुलाला घेऊन द्राक्ष कामासाठी गेले होते. सायंकाळी आई निर्मला शेतातून परतत असताना तिच्या सोबत रोहन ठाकरे हा चिमुकला होता. या वेळी मक्याच्या शेतात दबा धरून असलेल्या बिबट्याने मुलाला शेतात ओढून नेत जखमी केले. आई निर्मला ने जोरदार आरडा ओरडा केला. आजूबाजूचे जवळपास ५० शेतकरी जमा झाले. शेतकऱ्यांनी मक्याच्या शेताकडे धाव घेतली असताना बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला. मात्र, मुलाचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी सायखेडा पोलिस ठाण्याचे स.पो.निरीक्षक पी.वाय कादरी , पो.ना. पवन निकम, तान्हाजी झुरडे यांनी पंचनामा करून पुढील कारवाई केली. यावेळी दत्तु मुरकुटे पोलीस पाटिल संपत नागरे, चेअरमन दौलत मुरकुटे ,बबन मुरकुटे, शरद बाजारे, कृष्णा अष्टेकर उपस्थित होते.
हेही वाचलंत का?
- Child marriage | बीड : पत्नी हरवल्याची तक्रार दिली अन् बालविवाहाच्या गुन्ह्यात अडकला
- Australian Open final : नोव्हाक जोकोव्हिचने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन, नदालच्या विश्वविक्रमाची बरोबरी
- IND vs NZ 2nd T20 : इशान किशन पाठोपाठ राहुल त्रिपाठीही तंबूत परतला