Child marriage | बीड : पत्‍नी हरवल्याची तक्रार दिली अन् बालविवाहाच्या गुन्ह्यात अडकला | पुढारी

Child marriage | बीड : पत्‍नी हरवल्याची तक्रार दिली अन् बालविवाहाच्या गुन्ह्यात अडकला

केज: पुढारी वृत्तसेवा : धारूर येथून पत्‍नी बेपत्ता झालेल्या तक्रार दाखल करण्यास गेलेल्या तरुणासह १० जणांवर बालविवाहाचा (Child marriage) गुन्हा दाखल करण्यात आला. केज तालुक्यातील पाथरा येथील अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचा प्रकार पोलीस चौकशीत उघड झाला आहे. या प्रकरणी मुलीचे आई-वडील, सासू-सासरे, पती आणि मामा-मामीसह १० जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की,  विवाहिता (Child marriage) बेपत्ता असल्याची तक्रार १९ जानेवारी रोजी धारूर पोलीस ठाण्यात  कृष्णा मोटे यांनी दाखल केली होती. धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी तिला २७ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंप्री (ता. राहता) येथून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, विवाहितेने सांगितले की,  “तेराव्या वर्षी २० नोव्हेंबर २०२१ रोजी मामा सागर अशोक धोंगडे यांनी त्यांच्या गावी जानेगाव (ता. केज) येथे माझे लग्न धारूर येथील कृष्णा वैजनाथ शेटे यांच्यासोबत लावून दिले होते.” पोलिसांनी जन्म तारखेबाबत शालेय अभिलेख तपासून पाहिले. तिची जन्म तारीख २४ एप्रिल २००८ असल्याचे स्पष्ट झाले.

अल्‍पवयीन मुलीचा विवाह झाल्‍याची माहिती उजेडात येताच धारूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस जमादार दीक्षा चक्के सरकारतर्फे फिर्यादी झाल्या. युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात विवाहितेचा मामा सागर अशोक घोगडे, मामी (रा. जानेगाव) वडील महारूद्र बबन पांगे, आई सिंधु महारूद्र पांगे, भाऊ ओमकार महारूद्र पांगे, (रा. पाथरा), पती कृष्णा वैजनाथ शेटे, सासू शिवकन्या वैजनाथ शेटे, दीर गणेश वैजनाथ शेटे, जाऊ वैशाली गणेश शेटे (रा. धारूर), नवनाथ पटणे (रा. शेलगाव-गांजी) या दहा जणांविरुध्द युसुफवडगाव पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी बालविवाह प्रतिबंधक कायदा १९२९ चे कलम १० आणि ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button