Australian Open final : नोव्‍हाक जोकोव्‍हिचने जिंकले ऑस्‍ट्रेलियन ओपन, नदालच्‍या विश्‍वविक्रमाची बरोबरी | पुढारी

Australian Open final : नोव्‍हाक जोकोव्‍हिचने जिंकले ऑस्‍ट्रेलियन ओपन, नदालच्‍या विश्‍वविक्रमाची बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अनुभवाला आक्रमकता आणि संयमाची जोड देत उत्‍कृष्‍ट टेनिसचे प्रदर्शन घडवत सर्बियाच्‍या नोव्‍हाक जोकोव्‍हिच याने आज ऑस्‍ट्रेलियन ओपनवर पुन्‍हा एकदा आपल्‍या नावाची मोहर उमटवली. त्‍याने ग्रीसच्‍या स्‍टेफानोस त्‍सित्‍सिपास याचा ३-६, ६-७ (४-७ ),६-७ (५-७ ) असा पराभव केला. या कामगिरीमुळे जोकोव्‍हिचने राफेल नदालच्‍या २२ ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. विशेष म्‍हणजे, मागील ऑस्‍ट्रेलियन ओपन स्‍पर्धेत ( Australian Open final ) नोव्‍हाक जोकोव्‍हिचला लसीकरणाच्‍या मुद्‍यावरुन स्‍पर्धेत सहभागी होण्‍यापासून रोखण्‍यात आले होते. मात्र, यंदाच्‍या स्‍पर्धेत त्‍याने उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन घडवत ऑस्‍ट्रेलियन ओपनचे आपणच ‘किंग’ असल्‍याचे दाखवून दिले आहे.

अत्‍यंत भेदक सर्विस हे त्‍सित्‍सिपासच्‍या खेळाचे वैशिष्‍ट. मात्र, प्रतिस्‍पर्धी खेळाडूची भेदक सर्विस तेवढ्याच झूंझारपणे परतवणे हे जोकोव्‍हिच याच्‍या खेळाचे बलस्‍थान. आजच्‍या सामन्‍यात दोन्‍ही खेळाडूंनी उत्‍कृष्‍ट टेनिसचे प्रदर्शन घडवले. प्रतिस्‍पर्धी खेळाडूला दमवणे आणि त्‍याच्‍याकडून नकळत चुका घडवून आणणे, अशी जोकोव्‍हिच रणनीती असते. आज ऑस्‍ट्रेलियन ओपनच्‍या अंतिम सामन्‍यात  त्‍याने हीच रणनीती कायम ठेवत सलग तीन सेटमध्‍ये त्‍सित्‍सिपासला पराभूत केले.

पहिला सेटमध्‍येच जोकोव्‍हिचची सामन्‍यावर मजबूत पकड

पहिल्‍या सेटमध्‍ये दोघांनी एक-एक गेमची बरोबरी साधली. जोकोव्‍हिचने दुसर्‍या गेममध्‍ये आपली सर्विस कायम ठेवत
पहिल्‍या सेटमध्‍ये २-१ अशी आघाडी घेतली. पहिल्‍या सेटच्‍या दुसर्‍याच गेममध्‍ये त्‍सित्‍सिपासची भेदक सर्विस जोकोव्‍हिचने मोडत ३-१ अशी आघाडी घेतली. स्‍टेफानोस त्‍सित्‍सिपास बॅकहँडमध्‍ये अनेक चुका केल्‍या तर जोकोव्‍हिचने अप्रतिम बॅकहँड आणि लाजबाब फोरहँड लगावले. अनुभव पणाला लावत खेळ करत त्‍याने मागे वळून पाहिले नाही. अवघ्‍या ५० मिनिटांमध्‍ये त्‍याने पहिला सेट ३-६ असा आपल्‍या नावावर केला.

दुसर्‍या सेटमध्‍येही जोकोव्‍हिचचची आघाडी कायम

दुसरा सेटमध्‍ये जोकोव्‍हिचने आपली सामन्‍यावरील आपली पकड कायम ठेवली. त्‍सित्‍सिपासने दुसर्‍या सेटमधील पहिल्‍या गेममध्‍ये आपली भेदक सर्विस कायम ठेवली. जोकोव्‍हिचने अप्रतिम सर्विसचे प्रदर्शन घडवत दुसर्‍या सेटमध्‍ये १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर तिसर्‍या गेमपर्यंत दोघांनी आपली सर्विस कायम ठेवत ३-३ अशी बरोबरी साधली. मात्र चौथ्‍या आणि पाचव्‍या गेममध्‍ये दोन्‍ही खेळाडूंना आपली सर्विस कायम ठेवण्‍यासाठी प्रयत्‍नाची पराकाष्‍ठा करावी लागली. सहावा गेमपर्यंत दोघांनी बरोबरी कायम ठेवली. दुसरा सेट निकाल टायब्रेकरवर गेला. प्रतिस्‍पर्धी खेळाडूला दमवणे आणि त्‍याच्‍याकडून नकळत चुका घडवून आणणे, अशी जोकोव्‍हिच रणनीती असते. आजच्‍या अंतिम सामन्‍याच्‍या दुसर्‍या सेटमध्‍येही त्‍याने ही रणनीती टायब्रेकरवेळी कायम ठेवली. भेदक सर्विस आणि अप्रतिम फोरहँडच्‍या जोरावर सामन्‍यात त्‍याने दुसरा सेट ६-७ (५-७ )असा जिकंला.

तिसरा सेट जिंकत २२ वे ग्रँडस्लॅम पटकावले

तिसर्‍या सेटच्‍या पहिल्‍याच सर्विसमध्‍ये जोकोव्‍हिचचे संतुलन बिघडले. त्‍सित्‍सिपासने याचा अचूक फायदा तिसर्‍या सेटमधील पहिलेच सर्विस ब्रेक करत सामन्‍यात १-० अशी आघाडी घेत कमबॅक केले. मात्र पुढच्‍या गेममध्‍ये त्‍सित्‍सिपासची सर्विस ब्रेक करत जोकोव्‍हिचने बरोबरी साधली. सर्विस भेदक असली तरी बॅकहँडमध्‍ये त्‍याने चुका केल्‍या. दोन सेट गमावलेल्‍या त्‍सित्‍सिपास तिसर्‍या सेटमध्‍ये चांगली झूंज दिली. पाच-पाच अशी बरोबरी साधली.  अखेर तिसरा सेटही टायब्रेकरवर गेला. हा सेट ६-७ ( (४-७ )  असा जिंकत जोकोव्‍हिचने ऑस्‍ट्रेलियन ओपनवर दहाव्‍यांदा आपलं नाव कोरलं.

Australian Open final : स्‍टेफानोस त्‍सित्‍सिपास झूंजला पण…

अंतिम सामन्‍यात पहिल्‍या सेटमध्‍ये जोकोव्हिच याचे निर्विवाद वर्चस्‍व दिसले. मात्र दुसरा व तिसर्‍या सेटमध्‍ये स्‍टेफानोस त्‍सित्‍सिपास उत्‍कृष्‍ट सर्विसचे प्रदर्शन करत सुमारे तीन तास चालेल्‍या सामन्‍यात  जोकोव्‍हिच याला चांगलीच झूंज दिली.  दुसर्‍या व तिसर्‍या दोन्‍ही सेटमधील ट्रायब्रेकरमध्‍ये त्‍याच्‍याकडून नकळत चुका घडल्‍या आणि त्‍सित्‍सिपासला आपल्‍या पहिल्‍या ग्रँडस्‍लॅमपासून वंचित रहावे लागले.

जोकोव्‍हिचने ऑस्‍ट्रेलियन ओपन दहाव्‍यांदा जिंकला

जोकोव्हिचने या स्‍पर्धेच्‍या उपांत्‍य फेरीत अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 7-5, 6-1, 6-2 असा पराभव करत 10 व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल गाठली. आज अंतिम सामन्‍यात त्‍याने आपल्‍या नावाला साजेश खेळत केला. जोकोव्‍हिच याने २००८ मध्‍ये प्रथम ऑस्‍टेलियन ओपन स्‍पर्धा जिंकली होती. त्‍याने २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९, २०२० आणि २०२१ मध्‍ये जोकोव्‍हिचने ही स्‍पर्धा जिंकली होती. आता दहाव्‍यांदा त्‍याने ऑस्‍ट्रेलियन ओपन ग्रँडस्‍लॅमवर आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्‍यात बाजी मारत त्‍याने राफेल नदालच्या 22 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली आहे. तसेच ही स्‍पर्धा दहाव्‍यांदा जिंकण्‍याचा विक्रमही केला.

Australian Open final : जोकोव्‍हिचची अव्‍वलस्‍थानी झेप

ऑस्‍ट्रेलियन ओपन स्‍पर्धेतील विजेता हा टेनिसच्‍या जागतिक क्रमवारीत अव्‍वल स्‍थानावर पोहोचणार होता. त्‍यामुळे आजच्‍या अंतिम सामन्‍याला विशेष महत्त्‍व प्राप्‍त झाले होते. आजचा सामना जिकंत जोकोव्‍हिचने जागतिक क्रमवारीत अव्‍वलस्‍थानी झेप घेतली आहे. जून २०२२ नंतर तो पुन्‍हा अव्‍वलस्‍थानी आला आहे. यापूर्वी त्‍याने ३७४ आठवडे अव्‍वल स्‍थान टिकवले होते. हाही एक विक्रम ठरला होता.

सर्व वादावर पडता टाकत जोकोव्‍हिचच ‘किंग’

जोकोव्हिचचे वडील सर्दजान यांना स्टेडियमबाहेर पुतीन यांचा चेहरा असलेला रशियाचा झेंडा घेऊन उभ्या असलेल्या चाहत्यासोबत फोटो काढणे महागात पडले. जोकोव्हिचच्या क्वार्टर फायनलनंतर बुधवारी हा वाद उद्भवला होता. त्यानंतर युक्रेनने जोकोव्हिच याच्या वडिलांवर स्पर्धेत बंदी घालण्याची मागणी केली. सर्दजान यांनी सेमीफायनलपूर्वी एक वक्तव्य प्रसिद्ध केले. त्यांनी सेमीफायनलपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. या स्‍पर्धेदरम्‍यान वडील वादाच्‍या भोवर्‍यात सापडले तरी जोकोव्‍हिच याने आपल्‍या संयमित खेळाचे प्रदर्शन करत २२ वे ग्रँडस्‍लॅम आपल्‍या नावावर केले.

 

 

 

Back to top button