पक्षातून गद्दार गेले आणि आम्हाला हिरे सापडले : उद्धव ठाकरे | पुढारी

पक्षातून गद्दार गेले आणि आम्हाला हिरे सापडले : उद्धव ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

इतके दिवस आम्ही गद्दारांनाच हिरे समजून पैलू पाडत होतो. त्याचा काही उपयोग झाला नाही. पक्षातून गद्दार गेले आणि आम्हाला हिरे सापडले, असे सांगत नाशिक जिल्ह्यातील भाजप नेते अद्वय हिरे यांच्या हाती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे आणि  नाशिक जिल्ह्यातील अनेक भाजप पदाधिकार्‍यांनी काल शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या  उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही काही दगडांना हिरे म्हणून नाचवत राहिलो. मात्र, दगड गेले, बुडाले आणि बुडणार आहेत, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राजकारणाच्या बाबतीत देशात आणि राज्यात किळसवाणा प्रकार सुरू आहे. भाजपनेच हा घाणेरडा पायंडा भाजपने पाडला आहे. तो पायंडा गाडून टाकायचा आहे. गद्दार लोक हे स्वतःच्या स्वार्थासाठी जगत आहेत. काही जणांनी अन्नाची शपथ घेतली आणि गद्दारी केली. आता अन्नाची शपथही खरी घेतली नसेल तर काय बोलणार, असे सांगतानाच आपण लवकरच मालेगावात सभा घेणार आहोत अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

तर, अद्वय हिरे आतापर्यंत शिवसेनेमुळे विधानसभेत पोहोचू शकले नाहीत. परंतु, आता शिवसेनेमुळेच ते विधानसभेत पोहोचतील, असे खा. संजय राऊत यावेळी म्हणाले. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत आदी उपस्थित होते. 50 गद्दारांमुळे भाजपला आमची गरज उरली नाही, असा संताप अद्वय हिरे यांनी यावेळी व्यक्त केला.
कालपासून भाजपला माझी अचानक आठवण झाली. पुढच्या काळात  उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उभा राहण्यासाठी काम करू,

असे हिरे म्हणाले. मी आता भाजपमधून बाहेर पडलोय, पण 49 मतदारसंघांत कुचंबणा झालेले भाजपाचे नेते थांबले आहेत. निवडणुका लागताच ते शिवसेनेत येतील, असा दावा  हिरे यांनी यावेळी केला. दरम्यान, अद्वय हिरे यांना पक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी एकाचवेळी भाजपला आणि शिंदे गटाचे दादा भुसे यांना शह दिला आहे.  नाशिकमधील भाजपचा बडा चेहरा असणार्‍या हिरे यांचा दादा भुसे यांच्या मालेगावात दांडगा संपर्क आहे.

हिरे यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. तेव्हापासून हिरे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू होत्या. अखेर काल त्यांनी अधिकृतपणे हाती शिवबंधन बांधले. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या अनेक नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हिरे यांच्या माध्यमातून हे नुकसान भरून काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

Back to top button