नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटील यांच्यासाठी छगन भुजबळ उतरले मैदानात | पुढारी

नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटील यांच्यासाठी छगन भुजबळ उतरले मैदानात

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीची ताकद असून पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडूण आणण्यासाठी घटक पक्षांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक पदवीधर निवडणूक मदतदानाची तारीख जवळ आली आहे, त्यादृष्टीने नाशिकमध्ये हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे पार पडली. यावेळी भुजबळ बोलत होते.

यावेळी नाशिक पदवीधर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार दिपीका चव्हाण, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिवराम झोले, शिवसेना उपनेते सुनील बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण शुभांगी पाटील यांना आहे. पदवीधर मतदासंघात पहिल्या महिला उमेदवार म्हणून त्यांचा विजय पक्का असून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी पुन्हा आपल्याला एकत्र यायचे आहे. तो पर्यंत सर्वांनी परिश्रम घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून शुभांगी पाटील यांच्या पाठिशी पूर्ण ताकदीने उभी राहील अशी भूमिका यावेळी भुजबळांनी स्पष्ट केली.

पदवीधर निवडणूक ही आगामी निवडणुकांमधील महाविकास आघाडीचा पाया असून सर्व पदवीधर मतदारानी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी तयारीला लागावे. आपली एकजूट टिकून ठेवत आघाडी अधिक मजबूत करावी असे आवाहन केले.

हेही वाचा :

Back to top button