नाशिक : मनपाच्या एनडीटीएलने मुलांना दिला खगोलशास्त्राचा अनोखा अनुभव | पुढारी

नाशिक : मनपाच्या एनडीटीएलने मुलांना दिला खगोलशास्त्राचा अनोखा अनुभव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेकडून अंमलबजावणी होत असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट टिंकरिंग लॅबोरेटरीने (एनडीटीएल) विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रावर एक मायक्रोकोर्स त्र्यंबक रोडवरील इस्पॅलियर हेरिटेज स्कूल येथे आयोजित केला होता. यावेळी नऊ शाळांमधील विद्यार्थी तसेच अनेक पालकही उपस्थित होते. त्यांना खगोलशास्त्र, टेलिस्कोपी आणि खगोल भौतिकशास्त्र तज्ज्ञांकडून शिकण्याची, थेट संवाद साधण्याची आणि आकाशाचा शोध घेण्याची आनंददायी संधी मिळाली.

यशवंतराव चव्हाण तारांगण येथे स्थित एनडीटीएलची अंमलबजावणी करणारी संस्था नाशिक मनपा आहे. ही लॅब डीपीडीसीच्या नावीन्यपूर्ण निधीतून स्थापित करण्यात आली आहे. सचिन जोशी यांनी स्वागत केले. ओओइएफचे संचालक रामाशिष भुतडा यांनी प्रस्तावना केली. त्यानंतर इस्रो प्रमाणित अंतराळ शिक्षण संस्था असलेली कल्पना युथ फाउंडेशनच्या (केवायएफ) संस्थापकांनी टेलिस्कोपीवर एक सत्र घेतले. हेमंत आढाव यांनी टेलिस्कोपचे घटक, वैज्ञानिक तत्त्वे आणि अभियांत्रिकी याविषयी माहिती दिली. खगोल छायाचित्रण (एस्ट्रोफोटोग्राफी) तज्ज्ञ नितीन धवले यांनी खगोल छायाचित्रणासाठी त्र्यंबकजवळ आपली स्वतःची ऑब्सर्वेटरी बनवली आहे. स्वतः टिपलेल्या खगोलीय वस्तू आणि घटनांच्या अनेक चित्रांसह त्यांनी निरीक्षण आणि खगोल छायाचित्रण यातील फरक स्पष्ट केले. स्टॉकहोम विद्यापीठातील तरुण खगोल भौतिक शास्त्रज्ञ डॉ. कुणाल देवरस यांनी तिसर्‍या सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शेवटच्या सत्रात केवायएफ टीमचे सदस्य सुशांत राजोळे, पवन कदम आणि प्रज्वल लोखंडे तसेच खगोल छायाचित्रण तज्ज्ञ नितीन धवले यांच्या मदतीने टेलिस्कोपद्वारे सहभागींना गुरू, शनि, शुक्र, मंगळ, बुध, आकाशगंगा आणि अशा अनेक खगोलीय वस्तू पाहण्याचा आनंद घेता आला. या मायक्रोकोर्सनंतर पुढे काय असे विचारले असता, रामाशिष यांनी सांगितले, की आम्ही इस्पॅलियर स्कूलच्या सहकार्याने मायक्रोकोर्सची ही आवृत्ती आयोजित केली. त्याचप्रमाणे, आम्ही इतर शाळांसोबत या मायक्रोकोर्सच्या आवृत्त्या चालवू जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना या विषयात मनापासून रस आहे त्यांना आम्हाला शोधता येईल. सर्व शाळा-महाविद्यालयांनी एनडीटीएलचा लाभ घ्यावा. 9820476345 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ओओइएफचे संचालक रामाशिष भुतडा यांनी केले आहे.

हेही वाचा:

Back to top button