धुळे : सावळदे पुलावर अपघात ; ट्रक व बेपत्ता चालकाला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर

धुळे : सावळदे पुलावर अपघात ; ट्रक व बेपत्ता चालकाला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावळदे शिवारातील तापी नदीच्या पुलावर टायर फुटून उलटलेल्या क्रुझरला वाचवण्याच्या प्रयत्नात पुलाचे कथडे तोडून तापी नदी पात्रात बुडालेला ट्रक हा राजस्थान राज्यातील असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या ट्रकचा चालक अद्याप बेपत्ता असून सापडलेल्या कागदपत्रानुसार त्याचे नाव दीपक कुमार असल्याची माहिती देखील तपासात पुढे आली आहे. दरम्यान क्रूजर मधील चार जण अद्यापही उपचार घेत असून किरकोळ जखमी असणाऱ्या 10 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर बुडालेला ट्रक बाहेर काढण्यात अद्यापही बचाव पक्षाला यश आलेले नाही.

मुंबई आग्रा महामार्गावर तापी नदीच्या या पुलावर नेहमी अपघाताच्या घटना घडतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील या पुलावरून कठडे तोडून एक अवजड वाहन नदीपात्रात कोसळले होते. ही घटना ताजी असतानाच रात्री पुन्हा याच पुलावर भीषण अपघात झाला आहे. वैजापूर येथून एमपी 09 एफए 6487 क्रमांकाची क्रुझर ही मजूर घेऊन मध्यप्रदेश राज्यातील सेंधवाकडे जात होता. ही गाडी मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावर आली असता क्रुझरचा टायर फुटला. परिणामी क्रुझर गाडी तापी नदीच्या पुलावरच उलटली. याचवेळी मागवून येणारा एक ट्रक हा उलटलेल्या क्रुझरला धडक देण्याच्या तयारीत असतानाच चालकाने क्रुझरला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात तापी नदीचा कथडा तोडून हा अवजड ट्रक नदीच्या पात्रामध्ये पडला. ही घटना लक्षात आल्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या ट्रक चालकांनी थांबून मदत कार्य सुरू केले. दरम्यान रात्रीच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंसाराम आगरकर तसेच नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांचे पथक पुलावर पोहोचले. मात्र अंधार असल्यामुळे आणि तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा असल्यामुळे रात्री बचाव कार्य करण्यात मोठ्या अडचणी आल्या.

दरम्यान सकाळी बचाव कार्य करणाऱ्यांना नदीच्या पात्रावर काही कागदपत्र आढळून आले आहे. या कागदपत्रानुसार या ट्रकचालकाचे नाव दीपक कुमार असल्याचे निदर्शनास आले असून तो कोटा येथील राहणारा असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. तर बुडालेला ट्रक देखील राजस्थान राज्यातीलच असल्याचा पोलिसांचा अंदाज असून ट्रकचालक अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान आज सकाळपासून पुन्हा बचाव कार्य सुरू करण्यात आले असून अद्यापही ट्रक बाहेर काढण्यात किंवा बेपत्ता चालकाला शोधण्यात यश आलेले नाही दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने संबंधित ट्रक मालकाचा शोध घेणे सुरू केले असून त्याला संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news