Accident : सावळदे पुलावर अपघात; क्रुझरला वाचवण्याच्या प्रयत्नात अज्ञात वाहन तापी नदीत कोसळले | पुढारी

Accident : सावळदे पुलावर अपघात; क्रुझरला वाचवण्याच्या प्रयत्नात अज्ञात वाहन तापी नदीत कोसळले

धुळे; पुढारी वृत्तसेवा :  सोमवारी (दि. २३) रात्री सावळदे पुलावर भीषण अपघात (Accident) झाला. मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा टायर फुटल्याने गाडी पुलावर उलटली. यानंतर मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चालकाने क्रुझरला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यात हे अज्ञात वाहन थेट तापी नदीत पात्रात कोसळले. या अपघातात क्रुझरमधील मजुर जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पुलावर अंधार असल्याने बचाव कार्य करणे अडचणीचे ठरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी नदी पुलावर मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा टायर फुटल्याने क्रुझर पुलावर उलटला. यानंतर मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाचा तोल जाऊन अवजड वाहन पुलाचे कठडे तोडून तापी नदीत कोसळल्याची घटना रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. वैजापूर येथून (MP 09 FA 6487) या क्रमांकाची क्रुझर मजूर घेऊन मध्यप्रदेश राज्यातील सेंधवाकडे जात होती. ही गाडी मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावर आली असता क्रुझरचा टायर फुटला. यामुळे क्रुझरचा समतोल बिघडला. मागून येणाऱ्या अज्ञात अवजड वाहनाने क्रुझर गाडीला वाचवण्याच्या प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात या अवजड वाहनाचा तोल गेल्याने वाहन तापी पुलाचे कठडे तोडून तापी नदीत कोसळला. (Accident)

या अपघातात अनेक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच चारचाकी क्रुझर वाहन हे तापी पुलावर पलटले असून या क्रुझर मधील मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. या पुलावर अंधार असल्याने तापी नदीत या भीषण अपघातात कोसळणारे वाहन नेमके कोणते आहे, याबाबत अद्याप ठोस माहिती मिळु शकलेली नाही. मात्र घटनास्थळी पुलाचे कठडे तुटल्याचे निदर्शनास येत आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर व नरडाणा पोलीस दाखल झाले आहेत. या भीषण अपघातात पुलावरून कोणते वाहन तापी नदी पात्रात कोसळले आहे. याचा शोध पोलीस व गावकरी करीत आहे.

हेही वाचा

Back to top button