Nashik : चक्क गावातील रस्ताच गेला चोरीला, शोधून देणार्यास पाच लाखांचे बक्षीसही जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात कागदोपत्री रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, हा रस्ता चोरीला गेल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानदान यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी (दि.18) कार्यकारी अभियंता संंजय नारखेडे आणि त्यांच्या पथकाने दिवसभर फिरून रस्ता शोधला, मात्र तो सापडण्यात अपयश आल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे हे प्रकरण आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाकडे वर्ग करण्याची मागणी द्यानदान करणार आहेत.
द्यानद्यान यांनी गावातून चोरी गेलेला रस्ता शोधून देणार्यास यापूर्वी एक लाख रुपयांनंतर दोन लाख रुपये व आता पाच लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. आठ महिन्यांपासून अनेक पथकांकडून या रस्त्याचा शोध सुरू आहे. परंतु रस्त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात तयार झालेला 18 लाख रुपये किमतीचा ‘चोरीला’ गेलेल्या रस्त्याचा अजूनपर्यंत शोध न लागल्याने गावकर्यांची चिंता वाढली आहे. याबाबत द्यानद्यान यांनी मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात चोरीची रीतसर तक्रार ही दाखल केली. प्रशासनाकडून या अजब चोरी प्रकरणाचा वेळोवेळी शोध घेतला जात आहे. परंतु, हाती काहीच लागत नसल्याने रस्ता गेला कुठे? याचा पेच वाढत चालला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहोत, असे द्यानद्यान यांनी सांगितले.
हेही वाचा :
- पुणे : पुस्तकांच्या ‘पायरेटेड पीडीएफ’कडे दुर्लक्षच
- नाशिक : म्हणे श्वानाला दगड मारला… कारची काच फुटली, मग काय नशेत सात वाहनांच्या काचा फोडल्या
- दरवर्षी खड्ड्यात जाणारा मुंबईकरांचा पैसा वाचवणार : मुख्यमंत्री शिंदे