पुणे : पुस्तकांच्या ‘पायरेटेड पीडीएफ’कडे दुर्लक्षच | पुढारी

पुणे : पुस्तकांच्या ‘पायरेटेड पीडीएफ’कडे दुर्लक्षच

सुवर्णा चव्हाण

पुणे : कोरोना काळात सुरू झालेला पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफचा काळाबाजार अद्याप सुरूच आहे. गेल्या अडीच वर्षांपासून परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफमुळे प्रकाशक मोठा आर्थिक तोटा सहन करीत आहेत. आधीच छापील स्वरूपातील पायरेटेड पुस्तकांची विक्री सुरूच असल्याने प्रकाशन व्यवसाय मोठ्या नुकसानीत आहे. पण, पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफमुळे प्रकाशन व्यवसायाचे नुकसान होत आहे.

काही प्रकाशकांनी याविरुद्ध आवाजही उठवला, पोलिसांना निवेदने दिली अन् तक्रारीही केल्या. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे प्रकाशकांमध्ये नाराजी आहे. नामवंत लेखक-प्रकाशकांच्या पुस्तकांचे पायरेटेड पीडीएफ विविध अ‍ॅपवर अजूनही उपलब्ध होत असून, हा प्रश्न अजूनही सुटलेला नसल्याचे प्रकाशक सांगतात. राज्य सरकारसह पोलिसांनी या प्रश्नाची गांर्भीयाने दखल घेण्याची मागणी होत आहे.

कॉपी राइट कायद्याचा भंग करून पुस्तकांना स्कॅन करून त्याला पीडीएफ स्वरूप दिले जात आहे. लोकांना अ‍ॅपद्वारे हे पीडीएफ थेट विनामूल्य मिळत असल्याने छापील पुस्तके विकत घेण्यापेक्षा काही वाचक हेच पुस्तकांचे पायरेटेड पीडीएफ वाचत आहेत. याचा प्रकाशकांपासून ते लेखकांपर्यंत सर्वांना आर्थिक फटका बसत आहे. कोरोना काळात हा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि तो आताही सुरूच आहे. याला आळा बसण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे प्रकाशकांचे म्हणणे आहे.

प्रकाशक चेतन कोळी म्हणाले, कोरोना काळात पायरेटेड पीडीएफचा सुळसुळाट सुरू झाला. तो आताही कायम आहे. विविध मोबाईल अ‍ॅपवर असे पीडीएफ पाहायला मिळतात. आमच्या प्रकाशनाची कित्येक पुस्तके पायरेटेड पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. पायरेटेड पीडीएफवरून आता छापील स्वरूपातील पायरेटेड पुस्तकेही तयार केली जात आहेत. छापील स्वरूपातील पायरेटेड पुस्तके आणि पायरेटेड पीडीएफ हे प्रकाशन व्यवसायासमोर असलेले मोठ्या अडचणी आहेत. त्या सुटल्या पाहिजेत.

अखिल मेहता म्हणाले, छापील स्वरूपातील पायरेटेड पुस्तकांचा आणि पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफच्या प्रश्नाविरुद्ध आम्ही अनेकदा आवाज उठवला आहे आणि तक्रारही केली आहे. पण, त्याला अजून आळा बसलेला नाही. आमची अनेक पुस्तकांचे पायरेटेड पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिली जात आहे. हे चुकीचे आहे. यामुळे ई-बुक वाचणार्‍यांची संख्याही कमी होत आहे. असे प्रकार करणा-यांवर कारवाई झाली पाहिजे.

आधीच छापील स्वरूपातील पायरेटेड पुस्तके सर्रास विकली जात आहेत. त्यात पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफच्या प्रश्नाला प्रकाशकांना सामोरे जावे लागत आहे. व्हॉट्सपसह अनेक अ‍ॅप्सवर असे पीडीएफ शेअर केले जात असून, ते सर्रास डाउनलोड केले जात असल्याचे दिसून येईल. कोरोना काळात 400 पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफ केले होते. सध्या पुस्तकांना पीडीएफचे स्वरूप देणे खूप सोपे झाले आहे. त्याचा लोक गैरवापर करीत आहेत. असे प्रकार थांबले पाहिजेत.

                                                              – सुनीताराजे पवार, प्रकाशिका

 

Back to top button