मुंबई : पुढारी वृत्तसेवा – भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि ऊर्फी जावेद यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार खपवून घेणार नाही. आज मुंबईत नंगानाच घालत आहे, उद्या बीडच्या चौकात उघडे-नागडे फिरले तर चालेल का? असा सवाल करत चित्रा वाघ यांनी पुन्हा ऊर्फीवर निशाणा साधला आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, असे त्या म्हणाल्या.
ऊर्फी जावेद जिथे दिसेल तिथे तिचे थोबाड फोडीन, या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यामुळे ऊर्फीचे मॉब लिंचिंग होण्याची भीती आहे, अशी तक्रार अॅड. नितीन सातपुते यांनी राज्य महिला आयोगाकडे तसेच मुंबई पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून वारंवार टीका केली जात असल्याने शुक्रवारी ऊर्फीने राज्य महिला आयोगात जाऊन आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भेट घेतली. यावेळी वाघ यांच्याकडून देण्यात आलेल्या धमक्यांमुळे असुरक्षित वाटत असल्याचे तिने सांगितले. त्यांना असुरक्षित वाटत असल्याची भावना त्यांनी आपल्याकडे व्यक्त केली असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.