शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी; आमदार पडळकर यांची टीका | पुढारी

शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी; आमदार पडळकर यांची टीका

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शरद पवार, अजित पवारांनी महाराष्ट्राचा निधी चोरून केवळ बारामतीला नेला आणि उर्वरित महाराष्ट्र यांनी कोरडाठाक ठेवला. इतकी वर्षे राजकारण करूनही 100 च्या पुढे आमदार एकदाही त्यांना निवडून आणता आले नाही. शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहे, याचा पुनरुच्चार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे म्हाळोबा मंदिराच्या शेजारी शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली. व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, तालुका प्रभारी जयंत आव्हाड, ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, मनोज शिरसाठ, दर्शन भालेराव आदी उपस्थित होते. पवारांच्या कुटुंबात कोणी खेळ खेळले नाही तरीसुद्धा शरद पवार क्रिकेट संघाचे अध्यक्ष, अजित पवार कबड्डी संघाचे अध्यक्ष, सुप्रिया सुळे खो-खो संघाचे अध्यक्ष आणि आता त्यांच्याच घरातला रोहित पवार पुन्हा एकदा क्रिकेट संघाचा अध्यक्ष कसा झाला ? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. रोहित पवारने कधी आयुष्यात बॅटही हातात धरली आहे का? असा प्रश्न आमदार पडळकर यांनी उपस्थित केला. ओबीसी समाजासाठी वेगवेगळ्या योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मार्फत सर्वसामान्य जनतेच्या पदरात पाडून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. भाजप तालुकाध्यक्ष शिंदे, तालुका प्रभारी आव्हाड, कुर्‍हाडे यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मारुती शिंदे, राजाभाऊ पोमनर, संकेत सानप, किशोर देशमुख, गंगाराम शिंदे, साहेबराव शिंदे, सोमनाथ शिंदे, सागर शिंदे, उत्तम मानकर, संतू जाधव आदींसह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

म्हाळोबा देवस्थानासाठी निधी कमी पडू देणार नाही
दोडी येथील म्हाळोबा हा नवसाला पावणारा देव आहे. याच म्हाळोबाचे दर्शन घेण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येत राहीन, असे वचन आमदार पडळकर यांनी दिले. म्हाळोबा देवस्थानाच्या विकासासाठी निधीची कमतरता अजिबात पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. या जिल्ह्यांमध्ये आणि सिन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचाच खासदार आणि आमदार निवडून यावा ही अपेक्षा त्यांनी भाषणामध्ये व्यक्त केली.

हेही वाचा:

Back to top button