पुणे : कोयता गँगच्या दहशतीचे लोण मध्यवस्तीत; तुळशीबागेतील स्टॉलची तोडफोड | पुढारी

पुणे : कोयता गँगच्या दहशतीचे लोण मध्यवस्तीत; तुळशीबागेतील स्टॉलची तोडफोड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उपनगरांमध्ये कोयत्या गँगची दहशत असताना आता असे प्रकार भर गर्दीच्या वेळी वसंत टॉकीजसमोरील तपकीर गल्ली आणि तुळशीबागेत टोळभैरवांनी दहशत माजवून स्टॉलची तोडफोड करण्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी पाटील इस्टेट येथील दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे मोबाईल मार्केट आणि तुळशीबागेतील व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली.

उपनगरात कोयता गँग तोडफोड करून दहशत माजवत आहेत. सिंहगड रोड पोलिसांनी त्यांच्यातील एकाला पकडून चांगला चोप दिला होता. त्या पोलिस कर्मचार्‍यांचे नागरिकांनी कौतुक केले. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनीही त्यांचा सत्कार केला. असे असताना हे दहशतीचे लोण आता मध्य वस्तीत पसरल्याचे दिसून येत आहे.

वसंत टॉकीजसमोरील तपकीर गल्ली ही मोबाईल मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे. या गल्लीत सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्या वेळी हातात कोयते, बांबू घेतलेले तोडाला रुमाल बांधलेले चौघे जण गल्लीत आले. ते एका कोपर्‍यापासून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत गेले. परंतु, गर्दीमध्ये कोणाच्या लक्षात आले नाही. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करीत तेथील मोबाईल दुकानावर हातातील कोयते, बांबूने सपासप वार करून तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्याबरोबर लोकांची एकच पळापळ सुरू झाली. त्यांनी दुकानासमोरील काउंटरवर लाथा मारून त्यावरील सामानाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुकानदारांनी पटापट दुकानांची शटर ओढून घेतली.

त्यानंतर या टोळक्याने आपला मोर्चा तुळशीबागेकडे वळविला. चौघांपैकी तिघे जण बाजीराव रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्रासमोरून आत गल्लीत शिरले. तेव्हा त्यांच्या हातात लाकडाचे वासे होते. ते संपूर्ण गल्लीतून चालत राम मंदिर ओलांडून सरळ तुळशीबागेत दुसर्‍या टोकाकडील बाबू गेनू चौकापर्यंत आले. गल्लीच्या तोंडावर असलेल्या एक-दोन स्टॉलवर त्यांनी हातातील वासे मारून सामानाची तोडफोड केली. तेथून पुन्हा उलट राम मंदिरासमोरील स्टॉलची मोडतोड केली.

तेथून ते तुळशीबाग गणपतीसमोर येऊन पळत कावरे कोल्डिंगपर्यंत गेले. जवळपास 5 स्टॉलवर त्यांनी तोडफोड केली. हा प्रकार सुरू झाल्याने एकच आरडाओरडा होऊन लोकांची पळापळ सुरू झाली. सुरुवातीला लोकांना काय होतेय, हे समजले नाही. तेथील दोघा व्यावसायिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यातील एकाला कावरे कोल्डिंगजवळ पकडले. काही वेळांतच पोलिस आल्यावर त्यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.

याबाबत फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले, की विश्रामबाग पोलिस व नागरिकांच्या मदतीने दोघांना पकडण्यात आले आहे. तपकीर गल्लीतील अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे. दोघेही अल्पवयीन असून, पाटील इस्टेट येथे राहणारे आहेत. भाईगिरी करण्यासाठी दहशत पसरविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या दोघा साथीदारांचा शोध सुरू आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Back to top button