केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड : केंद्राने वेगवान विकासासाठी तीन पटीने बजेट वाढविले | पुढारी

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड : केंद्राने वेगवान विकासासाठी तीन पटीने बजेट वाढविले

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सन 2014 मध्ये देशाचे बजेट 16 लाख कोटी होते. त्यानंतर यावर्षी देशाचे बजेट 44 लाख कोटी रुपये झाले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाचा वेग वाढविण्यासाठी देशाचे बजेट तीन पटीने वाढविले, मोदी विकासाची कामे करतात आणि आमच्याकडून कामे करून घेतात, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केले.

तालुक्यातील निमगाव-सिन्नर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, प्रभारी जयंत आव्हाड, जनार्दन सानप, सुनील बच्छाव, दत्तात्रय गवळी आदींसह मान्यवर उपस्थित होते. मोदींनी देशसेवा आणि धर्मसेवेला प्राधान्य दिल्याचे ते म्हणाले. मोदींमुळे प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते उघडले गेले असून, शेतकर्‍यांनी किसान क्रेडिट कार्डचा फायदा घ्यावा, असे ते म्हणाले. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर तुमच्या पाठीशी मी उभा असल्याचेही कराड म्हणाले. निमगाव-सिन्नरसाठी सरकारी बँकेची शाखा उघडून देण्याचे आणि अभ्यासिकेसाठी दहा लाख रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी केली. सिन्नरकरांच्या व शेतकर्‍यांच्या मागण्या डॉ. कराड यांच्यासमोर मांडल्या. यातील अनेक मागण्या राज्य सरकारच्या असल्याने सिन्नरच्या शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन जाऊ, असे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले. फडणवीस यांच्या माध्यमातून सिन्नरचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन कराड यांनी दिले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

राज्य सरकार चांगले काम करत आहे : कराड
शेतकर्‍यांनी मांडलेल्या कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी, जास्त क्षमतेचे रोहित्र बदलून देण्याची मागणी, शेतीपूरक व्यवसायांना अनुदानाची मागणी व विविध मागण्या सोडविण्यासाठी राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकार प्रयत्न करणार असल्याचे कराड म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सरकारदेखील चांगले काम करीत असल्याचे कराड म्हणाले.

कायमची कांदा निर्यातबंदी उठवा : आव्हाड
भाजपचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न मांडले. आव्हाड यांनी कायमची कांदा निर्यातबंदी उठविण्यासह शेतकर्‍यांना जास्त क्षमतेचे वीज रोहित्र बदलून देण्याची मागणी केली. शेतकर्‍यांनी गायी घेण्यासाठी अनुदान द्या आणि पीकविमा कंपन्या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देत नसल्याने त्यातून मार्ग काढण्याची मागणी जयंत आव्हाड यांनी यावेळी केली.

हेही वाचा:

Back to top button