नाशिक : महिन्याला अडीच लाख ज्येष्ठांचा लालपरीतून मोफत प्रवास | पुढारी

नाशिक : महिन्याला अडीच लाख ज्येष्ठांचा लालपरीतून मोफत प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ’अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ याअंतर्गत एसटीतून मोफत प्रवासाची संधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेला 26 ऑगस्ट 2022 पासून सुरुवात झाली असून, नोव्हेंबरअखेर नाशिक विभागातून 75 वर्षे वयोगटावरील तब्बल 8 लाख 2 हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटी बसमधून मोफत प्रवास केला. दरमहिन्याला सरासरी दोन लाख ज्येष्ठांनी मोफत प्रवास योजनेचा लाभ घेतला.

’प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद वाक्य मिरविणार्‍या एसटी महामंडळाकडून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्केपासून 100 टक्केपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देण्यात येते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त, अधिस्वीकृतीधारक आदी सवलतधारकांचा समावेश आहे. यापूर्वी एसटीतर्फे 65 वर्ष पूर्ण झालेल्यांना अर्ध्या तिकिटाच्या रकमेत प्रवास होता. आता अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत 75 वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजना लागू केली आहे. सुरक्षित प्रवासाची हमी मिळत असल्याने ज्येष्ठ नागरिक एसटीतून प्रवासाला पसंती देतात. लाल परीतून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत राज्य सरकारने बहाल केली आहे. एसटी महामंडळाच्या इतर बसप्रमाणे आता ज्येष्ठांना वोल्वो बसमधून मोफत प्रवास करता येत आहे. मोफत प्रवासामुळे ज्येष्ठांच्या चेहर्‍यावर हसू फुलले असून, त्यांना मोठा आधार मिळाला आहे. हा प्रवासाला फक्त जन्मदाखल्याची माहिती असणारे एखादे कागदपत्रे दाखवल्यावर करता येत असल्याने जिल्ह्यातील ज्येष्ठांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मागील चार महिन्यांत तब्बल आठ लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून सुखकर आणि आरामदायी प्रवासाचा आनंद लुटला आहे. दरम्यान, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेची माहिती हळूहळू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे मोफत प्रवास करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

मोफत प्रवास केलेल्या ज्येष्ठांची संख्या
ऑगस्ट- 15,502
सप्टेंबर- 2,15,389
ऑक्टोबर- 2,61,657
नोव्हेंबर- 3,10,400

हेही वाचा :

Back to top button