पुणे : हनी ट्रॅपमध्ये अडकवून मागितली खंडणी; मुंबईतील तरुणीवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : हनी ट्रॅपमध्ये अडकवून मागितली खंडणी; मुंबईतील तरुणीवर गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एका ऑनलाईन अ‍ॅपद्वारे ओळख झाल्यानंतर हनीट्रॅपमध्ये अडकवून, बँकेतील व्यवस्थापक तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याणीनगर येथील एका 32 वर्षांच्या तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुंबईतील कळंबोली येथील एका 30 वर्षांच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून 2021पासून सुरू होता.

अ‍ॅपद्वारे ओळख झाल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकून तिने संबंधित तरुणासोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर बदनामीची धमकी देऊन खंडणीची मागणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका बँकेत उपव्यवस्थापक आहेत. त्यांची व आरोपी महिलेची स्टार मेकर या ऑनलाईन अ‍ॅपद्वारे ओळख झाली. त्यानंतर तिने फिर्यादींना प्रेमाच्या जाळ्यात पाडले.

त्याच्या कल्याणीनगर येथील घरी तिचे येणे-जाणे सुरू झाले. त्याच्याबरोबर तिने शारीरीक संबंध ठेवले. त्याला शॉपिंगला घेऊन जाऊन बिल देण्यास लावू लागली. त्याच्या मोबाईलवरून स्वत:च स्वत:ला गपचूप मेसेज पाठवू लागली. काही दिवसांनी तिने आपले लग्न झाले असून आपल्याला एक मुलगा असल्याचे व आपले खरे नाव सांगितले. सुरुवातीला तिने तरुणाला वेगळेच नाव सांगितले होते. ती त्याला नातेवाईकांशी बोलू देत नसे. त्यानंतर त्याची फसवणूक करून फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांचा मानसिक छळ केला.

27 डिसेबर 2022 रोजी ती फिर्यादीकडे आली. आपल्याला नवीन घर घ्यायचे असल्याने 5 लाख रुपये देण्याची मागणी तिने केली. पैसे दिले नाही तर तुझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार करेन, अशी धमकी दिली. फिर्यादी यांचे ऑफिसमधील लोकांकडे व नातेवाईकांकडे बदनामी करेल, तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार करुन तुला व तुझ्या घरच्यांना कोणत्याही गुन्ह्यात अडकवून टाकेन, मी आत्महत्या करेल, अशी धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली. त्यांनी धीर दिल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Back to top button