जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट | पुढारी

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

नाशिक (मिनी मंत्रालयातून) : वैभव कातकाडे

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुका अधिकार्‍यांकडे वर्ग केल्या असल्या तरी तालुकास्तरावरून एकाही तक्रारीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागच या बोगस डॉक्टरांना पाठीशी घालून कारवाईस टाळाटाळ करत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

गेल्या दोन वर्षांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बोगस वैद्यकीय प्रॅक्टिस करणार्‍यांबाबत 23 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील 7, नांदगाव तालुक्यातील 5, मालेगाव तालुक्यातील 3, सिन्नर आणि निफाड 2, तर दिंडोरी, बागलाण, नाशिक आणि नाशिक मनपा या ठिकाणांहून प्रत्येकी 1 वेळोवेळी आरोग्य विभागाने या तक्रारी तालुकास्तरावर पाठवून त्याबाबत काय कारवाई केली याबाबत अहवाल मागवला होता. मात्र, तालुकास्तरावरून गेल्या दोन वर्षांत एकही अहवाल प्राप्त झाला नाही आणि जिल्हा परिषदेने त्याबाबत संबंधित तालुका आरोग्य अधिकार्‍यांना स्मरणपत्र पाठविण्याची तसदी घेतली नसल्याने हे बोगस डॉक्टर सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बोगस डॉक्टरांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांसह त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव, तर जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी आरोग्य हे सदस्य आहेत. ज्या नागरिकांना बोगस डॉक्टरांबाबत संशय येतो त्यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येते. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करून त्यांवर काय कारवाई केली याबाबतचा अहवाल मागवला जातो. याबाबत बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत. मात्र, अद्याप याबाबत एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई झालेली नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे. वर्षभरापूर्वी शहरातील उपनगर येथून अशाच एका बोगस डॉक्टरला दहशतवादविरोधी पथकाने पकडले होते. त्यामुळे या प्रकारे जर आरोग्य विभाग बोगस डॉक्टरांना पाठीशी घालत असेल तर हे सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ ठरणार आहे. याबाबत प्रशासनाने मुख्य भूमिका घेत या डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी कणखर धोरण आखले पाहिजे.

2020 मध्ये प्राप्त तक्रारी…
निफाड 2, बागलाण 1, मालेगाव 1
2021 मध्ये प्राप्त तक्रारी
नांदगाव 4, नाशिक 1, मालेगाव 1, नाशिक मनपा 1,
2022 मध्ये प्राप्त तक्रारी
दिंडोरी 1, इगतपुरी 7, सिन्नर 2, मालेगाव 1
2023 मध्ये प्राप्त तक्रारी
नांदगाव 1

हेही वाचा:

Back to top button