पंतगाचा इतिहास आणि रोचक कथा | पुढारी

पंतगाचा इतिहास आणि रोचक कथा

नाशिक (निमित्त) : दीपिका वाघ

हातातल्या एका बारीकशा धाग्याने कागदाचा एक तुकडा (पतंग) हवेत उंच उडतो ही कल्पनाच किती भन्नाट आहे ना..! पण या धाग्याने आजवर अनेक मुके प्राणी, माणसांचा जीव घेतला आहे. पतंगाचा अनोखा खेळ अनेक शतकांपासून भारतात खेळला जातो पण हा खेळ चीनमधून भारतात आला . पहिला पतंग चीनमध्ये उडवला गेल्याचा इतिहास आहे.

हान सिन नावाच्या चिनी सेनानीने इसवी सन पूर्व 206 मध्ये युद्धात पतंगाचा वापर केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. चिनी, जपानी, मलायी, कोरियन लोकांचा राष्ट्रीय खेळ पतंग हा आहे. चीनमध्ये नवव्या महिन्याचा नववा दिवस पतंग दिन म्हणून साजरा केला जातो. पतंगाशी संबंधित काही धार्मिक समजूत आहेत जसे की, रात्री घरावर पतंग उडवल्यावर भुते दूर पळतात. बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने 1752 मध्ये वीज चमकणे हे विद्युत शक्तीमुळे घडते याचा शोध लावला. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी पतंगाचा वापर केला. वैज्ञानिक प्रयोगांमध्ये हा सर्वात प्रसिद्ध प्रयोग मानला जातो. वार्‍याची दिशा, रेडिओ लहरी, हवामानाचा अंदाज अशा अनेक प्रयोगांमध्ये पतंगाचा वापर करण्यात आला होता. आता भारतात पतंग कधी आला, हे निश्चित सांगणे कठीण आहे पण संत कवींच्या रचनांमध्येही पतंगाचा उल्लेख आणि वर्णन आढळून येते. 1270 ते 1350 संत नामदेवांनी लिहिलेल्या मराठी व व्रज भाषेतील काव्यांमध्ये पतंगाचा उल्लेख आढळतो. (आणिले कागद साजिले गुडी आकाश मंडल छोडी, पाच जनासो बात बाताडवो, चितसो दोरी राखिला) भारतात पतंग शब्दाचा प्रथम वापर कवी मंझर यांनी 1542 मध्ये लिहिलेल्या मधुमालती रचनेमध्ये आढळतो. (पांती बांधी पतंग उराई दियो तोहि ज्यो पियमह जाई) हे काही दाखले जिथे पतंगाचा उल्लेख आढळून येतो. आता भारतात पतंगोत्सव कसा साजरा केला जातो, त्याबद्दलः गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, बिहार या राज्यांमध्ये पतंगबाजी प्रसिद्ध आहे. पतंग काटण्यासाठी लागणारी चढाओढ, त्यात सहभागी होणारे, एखाद्या मोठ्या खेळाला शोभेल असे वातावरण पतंगोत्सवात बघायला मिळते. पतंग उडवायवला विशेष कौशल्य लागते. आता पतंगाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जातात.

पतंग उडवताना वापरले जाणारे शब्द : पेच काप, ढिल दे, पतंग बदव, लपेट, ढेल (मोठा पतंग) चौरंगा, दुरंगा, चाँद, काय पो छे, गै बोला ना रे धीना..

मांजा असा तयार केला जातो… सुती / कापसापासून तयार केलेला मांजा मऊसूत असतो. तो हाताने लगेचच तुटतो. फारसा मजबूत धागा नसल्याने पतंग उडवण्यासाठी त्याचा वापर केला जात नाही. प्लास्टिक, नायलॉन धाग्यापासून तयार केलेल्या मांजाला चायनीज मांजा म्हणतात. तांदूळ शिजवून भाताचे पाणी, काच, इबेसगोल आणि काही औषधी वनस्पतींचे मिश्रण करून लगदा तयार केला जातो आणि हा लगदा सुती धाग्याच्या दोरीवर घासून लावला जातो. त्यामुळे मजबूत मांजा तयार होतो. पण, या मांजाने हात कापला जातो. धातूचे तुकडे, काच पावडर नायलॉन मांजावर लावल्यावर चायनीज मांजा तयार होतो. हे मांजे जीवघेणे असतात. पण, आकाशात पतंग उंच उडण्यासाठी याच मांजाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

मांजा विक्रीवर बंदी असली, त्यावर कारवाई होत असली तरी छुप्या मार्गाने मांजा बाजारात येत आहे. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी झालेली आहे. पक्ष्यांच्या निवार्‍यासाठीदेखील फार झाडे उरली नाहीत. सुती धागा ज्याप्रमाणे कुजतो तसा हिवाळ्याच्या हंगामात मांजा कुजत नाही. त्यासाठी पतंगप्रेमींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. -शेखर गायकवाड (पर्यावरण, पक्षीप्रेमी).

हेही वाचा:

Back to top button