नाशिक : दिंडोरीत आज परिवर्त ग्रामीण साहित्य संमेलन | पुढारी

नाशिक : दिंडोरीत आज परिवर्त ग्रामीण साहित्य संमेलन

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंच आणि परिवर्त बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे एकदिवसीय परिवर्त ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. रविवारी (दि.8) होणार्‍या या संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती स्वागताध्यक्ष नितीन भुजबळ, संयोजन समितीचे अध्यक्ष तुषार वाघ, कार्याध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे, प्रा. गंगाधर अहिरे, नितीन गांगुर्डे, डॉ. धीरज झाल्टे, नितीन बागूल, गोकुळ आव्हाड यांनी दिली.

आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात भव्य मंडप उभारण्यात आला असून, स्वागताच्या तीन कमानी मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेल्या आहेत. संमेलन परिसराला ‘सत्यशोधक कर्मवीर रावसाहेब थोरात नगरी’ हे नाव देण्यात आले असून, सभागृहाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड नावाने संबोधले जाणार आहे. प्रा. अविनाश डोळस ग्रंथ दालनात, ग्रंथविक्रीच्या स्टॉल्सची व्यवस्था असून, त्यापैकी एका स्टॉलवर दिंडोरी तालुक्यातील साहित्यिकांचे साहित्य ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी दिंडोरी तालुक्यातील साहित्यिकांना आवाहन करण्यात आले आहे. भोजन कक्ष, पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था, स्टेज व्यवस्था, स्वागत समिती आदी विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ठिकठिकाणी डिजिटल बॅनर झळकताहेत. संविधान रॅलीत सहभागी होणार्‍या जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लेजीम पथक व संबळ वाजंत्री सज्ज असल्याचे नितीन भुजबळ व तुषार वाघ आणि राजेंद्र गांगुर्डे यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष कवी अमोल बागूल, उद्घाटक कवी इंद्रजित भालेराव आणि ना. नरहरी झिरवाळ काल सायंकाळी दिंडोरीत पोहोचले आहेत, अशी माहिती संमेलनाचे प्रमुख कार्यवाह प्रा. गंगाधर अहिरे, प्राचार्य दिनकर पवार व प्रदीप जाधव यांनी सांगितले. संमेलन यशस्वी करण्यासाठी बापू चव्हाण, कवी संविधान गांगुर्डे, मिहिर गजभे, काशीनाथ वेलदोडे, भास्कर साळवे, प्राचार्य रमेश वडजे, संतोष कथार, राजेंद्र मोकळ, अमोल गणोरे, सदाशिव वाघ, पवन देशमुख, पोपट शेखाजी पाटील, मनोज पाटील आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा:

Back to top button