पालकमंत्र्यांची भूमिका स्वागतार्ह : विनायकराव देशमुख | पुढारी

पालकमंत्र्यांची भूमिका स्वागतार्ह : विनायकराव देशमुख

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे नामांतर व विकास आराखड्याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका स्वागतार्ह असून जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या भूमिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी व्यक्त केले. देशमुख म्हणाले, जिल्ह्याच्या नामांतराबाबत पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली, हे चांगलेच झाले. किमान आतातरी जिल्ह्याबाहेरील मंडळी सवंग प्रसिद्धीसाठी अशा बेताल मागण्या करणार नाहीत,अशी अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या विकास आराखड्यासंदर्भात पालकमंत्र्यांची भूमिका विशेष स्वागतार्ह आहे.

प्रामुख्याने औद्योगिक व पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. याबाबत योग्य नियोजन झाल्यास आगामी काळात मोठा रोजगार निर्माण होईल. पर्यटन विकास, औद्योगिक विकास यासोबतच रस्ते मार्ग, लोहमार्ग व हवाई मार्गाच्या दळणवळण सुविधा निर्मिती कडेही विशेष लक्ष द्यावे लागेल. विकासाची दृष्टी असलेल्या पालकमंत्र्यांनी आता याबाबत स्वतः पुढाकार घेतल्यामुळे विकास आराखड्याची संकल्पना निश्चितच प्रत्यक्षात येईल, असा विश्वास व्यक्त करून देशमुख म्हणाले, दक्षिण भागाच्या तुलनेत उत्तर भाग अधिक विकसित आहे, दक्षिणेवर नेहमी अन्याय होतो, असा दावा नेहमी केला जातो.

यामध्ये काही प्रमाणात नक्कीच तथ्य आहे. मात्र, आता केवळ एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. दक्षिण भागाची अनेक बलस्थाने आहेत. दुर्मिळ असा ऐतिहासिक वारसा, देशातील मोठे लष्करी केंद्र, अवतार मेहेरबाबा समाधी, आचार्य आनंदॠषिजींची समाधी, मोहोटादेवी देवस्थान यासारखी जगप्रसिद्ध धार्मिक स्थळे, राळेगण सिद्धी व हिवरे बाजार सारखी आदर्श गावे यासारख्या बलस्थानांचा नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग केल्यास दक्षिणेच्या विकासाचा अनुशेष भरून काढता येईल, असे देशमुख म्हणाले.

Back to top button