सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर : शाश्वत विकासाचा मार्ग जनकल्याणातून जातो | पुढारी

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर : शाश्वत विकासाचा मार्ग जनकल्याणातून जातो

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
विकासाच्या व्याख्या नेमकेपणाने तपासणे आणि त्याच्याशी सुसंगत वर्तन करणे ही काळाची गरज असल्याने शाश्वत विकासाचा मार्ग जनकल्याणातून जातो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. कॅम्प सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या नूतन व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.

शेतकर्‍यांचे, कामगारांचे, शोषितांचे, वंचितांचे प्रश्न विक्राळ रूप धारण करीत आहेत. विकासाच्या नावाखाली जर शोषण होत असेल तर ते थोपविणे जनआंदोलनाचे आणि तुम्हा आम्हा सार्‍यांचे कर्तव्य आहे. नद्यांशी होणारे गैरवर्तन, पाण्याचे निर्बुद्ध नियोजन, अनिर्बंध वाळू उपसा यामुळे भविष्यात नद्या कोरड्या पडतील आणि मानवी जगणे अधिक दुसह्य होईल, असेही पाटकर पुढे म्हणाल्या. अनेक कागदपत्रांचा आधार घेत त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असे विवेचन करून श्रोत्यांना भारावून टाकले. अध्यक्षपदावरून मामको बँकेचे संचालक सतीश कलंत्री यांनीही जनआंदोलन संदर्भात विचार मांडले. यावेळी अ‍ॅड. भास्कर तिवारी, प्रा. अंकुश मयाचार्य, डॉ. विनोद गोरवाडकर, रमेश उचित, डॉ. अक्षय पवार यांसह श्रोते उपस्थित होते.

राज्यघटना सर्वसामान्यांचे चिलखत : कांबळे
मालेगाव : 1857 च्या बंडामध्ये भारतीय राज्यघटनेची बीजे सापडतात, त्यानंतरच्या काळात औंध संस्थानात भारतातली पहिली घटना महात्मा गांधीच्या मार्गदर्शनाने बनविण्यात आली व तेथून खर्‍या अर्थाने आताची राज्यघटना बनण्यास प्रारंभ झाल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले. व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. भारतीय संविधानाचे महत्त्व अनन्यसाधारण असून राष्ट्र नावाचे स्वप्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण करण्याचे महत्तम कार्य राज्यघटनेने केले आहे. या पाठीशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे योगदान शब्दातीत असल्याचे साहित्यिक कांबळे पुढे म्हणाले. भारतीय व्यक्ती जन्माला आल्याबरोबर त्याला राज्यघटनेची मालकी मिळते ही बाब जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही, म्हणूनच भारतीय राज्यघटना अद्वितीय असून येथील दीडशे कोटी नागरिकांना मिळालेले ते अभेद्य चिलखत आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यघटनेच्या निर्मितीचा अद्भुत प्रवास उलगडून दाखविताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात पैलूंचेही दर्शन उपस्थित श्रोतांना घडवून मंत्रमुग्ध केले. तत्पूर्वी कॅम्प सार्वजनिक वाचनालयातर्फे साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल कवयित्री शोभा अशोक बडवे यांना माऊली साहित्य भूषण पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल माऊली उद्योग भूषण पुरस्कार उद्योगपती विजय पोफळे यांना, तर वैद्यकीय क्षेत्रातील निस्वार्थी सेवेबद्दल माउली जीवनगौरव पुरस्कार डॉ. रमेश पटेल यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे पोपटराव देशमुख, तर प्रमुख पाहुणे अपर पोलिस अधिकारी अनिकेत भारती हे होते.

Back to top button