भोर : श्री काळूबाईदेवीच्या यात्रेला आजपासून प्रारंभ | पुढारी

भोर : श्री काळूबाईदेवीच्या यात्रेला आजपासून प्रारंभ

भोर; पुढारी वृत्तसेवा : मांढरदेवी (ता. वाई) येथील श्री काळूबाईदेवीच्या यात्रेला पौष पौर्णिमेपासून (दि. 6 व 7) प्रारंभ होत आहे. यामुळे मांढरदेवीच्या पायथ्याशी असणार्‍या भोर तालुक्यातील नेरे, बालवडी, आंबाडे, पळसोशी, वरवडी, पाले गावात 144 कलम जारी केल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले. मांढरदेवची काळूबाई यात्रेसाठी प्रशासन सज्ज आहे. पशुहत्या, वाद्य वाजविणे, देव्हारे नाचविणे, दारू नेण्यास बंदी घातली आहे. नियम मोडणार्‍या भाविकांवर कारवाई करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.

कलम 144 नुसार भोर तालुक्यातील नेरे, बालवडी, आंबाडे, पळसोशी, वरवडी, पाले तसेच श्री काळेश्वरी मंदिर परिसरामधील कांजळे, वर्वे बु, वर्वे खु. या ठिकाणी पशुहत्येस मनाई केली आहे. वाहनातून यात्रेच्या ठिकाणी बळी देण्यासाठी प्राणी नेण्यासही प्रतिबंध आहे. मांढरदेव परिसरात वाद्य आणण्यास व वाजविण्यास बंदी आहे. मांढरदेव परिसरात तसेच देवालयाच्या परिसरातील झाडांवर खिळे ठोकण्यास, लिंबू टाकणे, काळ्या बाहुल्या, भानामती करणे, करणीस प्रतिबंध केला आहे. यात्रेसाठी भोर-मांढरदेवी रस्ता सुरळीत केला असून अतिक्रमणे काढणे, वाहतूक नियोजन, आरोग्या सेवासुविधा, एसटी सेवा सुरळीत केली आहे.

Back to top button