नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संविधानानुसार प्रत्येक जण आपापल्या आवडी-निवडीनुसार विवाह करू शकताे. लव्ह आणि जिहाद हे दोन्ही एकत्र येऊच शकत नाहीत. परंतु, सध्या केवळ लव्ह-जिहादच्या नावाने बदनामी सुरू आहे. भाजप सत्तेत असलेल्या प्रत्येक ठिकाणी लव्ह-जिहादविरोधी कायदा केला जात आहे. परंतु, हा कायदाच बेकायदेशीर आहे, असा दावा एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी करत महाराष्ट्र सरकारने असा कायदा करण्यापूर्वी राज्यघटनेचा अभ्यास करावा, असा सल्ला दिला आहे.
खासदार ओवेसी एका खासगी कार्यक्रमानिमित्त नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत लव्ह-जिहाद कायद्याबाबत केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. ओवेसी म्हणाले, भारत देश संविधानावर चालतो. संविधानानुसार कोणीही आवडी-निवडीप्रमाणे विवाह करू शकतो. मात्र भाजपकडून प्रत्येक प्रश्नाला जातीयवादाचा रंग दिला जात आहे. महाराष्ट्रात लव्ह-जिहादप्रश्नी मोर्चे निघत आहेत. लव्ह-जिहाद म्हणणारे भाजपमध्ये असे किती लोक आहेत की त्यांनी अशी लग्ने केली आहेत. तेव्हा कायदा कसा अवलंबणार? असा प्रश्नी त्यांनी उपस्थित केला. आपल्याकडे बेरोजगारी, महागाईसारखे अनेक ज्वलंत विषय आहेत. त्यावर शासनाने भर देणे आवश्यक आहे. जगात सर्वाधिक बेरोजगार भारतात आहेत. आठ टक्के बेरोजगारी देशात असून, बेरोजगार तरुणांना भरकटवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यपालांचे वक्तव्य चुकीचेच
महापुरुषांबाबत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांबाबत निषेध व्यक्त करीत, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले वक्तव्य चुकीचेच आहे. औरंगजेबबाबत राष्ट्रवादी आणि भाजपलाच विचारा. ईडीच्या कारवाया या भाजप काळात सर्वाधिक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तरुणांना नोकरी द्या, महागाई कमी होत नसल्याने हा राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा असल्याचा आरोप खासदार ओवेसी यांनी केला.
आंबेडकरांचा मी सन्मानच करतो
प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती केल्याबाबत खासदार ओवेसी यांना विचारले असता, त्यांनी युती का केली हे मला माहिती नाही. परंतु, मी प्रकाश आंबेडकर यांचा आजही सन्मानच करतो, असे त्यांनी सांगितले. युतीचा निर्णय आंबेडकरांचा आहे. वंचित समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यादृष्टीनेच एमआयएम आणि वंचित आघाडी एकत्र आली होती. मात्र आता युती तुटल्याने त्यावर काय बोलणार, असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. सम्मेत शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा काढण्याच्या जैन समाजाच्या मागणीवर, आम्ही जैन धर्मीयांसोबत असून, प्रत्येक समाजाची एक आस्था असते. त्याचा विचार झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.