पणजी, पुढारी वृत्तसेवा : मूळची महाराष्ट्रातील; पण सध्या गोव्यातील करंजाळे पणजी येथे राहणार्या एका महिलेने अमेरिकन नवरा मिळावा, यासाठी तब्बल 2 कोटी 69 लाख रुपये खर्च केले. मात्र, तिला अमेरिकन नवरा काही मिळाला नाही. मात्र, बँकेचे खाते रिकामे झाले. शेवटी आपण फसले गेल्याचे कळताच तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
सविस्तर माहिती अशी, या महिलेला अमेरिकन पुरुषाशी लग्न करायचे होते. त्यासाठी लागणारा यूएसए फियान्से व्हीस्सा देण्याचे आमिष एका व्यक्तीने तिला दाखविले. महिला या आमिषाला भुलली व संबंधित व्यक्तीने सांगितलेल्या बँकेच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा करत राहिली. ही रक्कम तब्बल 2 कोटी 69 लाख रुपये झाली; तरी अमेरिकन नवर्याचे तोंड काही पाहता आले नाही.
त्यामुळे तिला त्या मध्यस्थ व्यक्तीचा संशय आल्याने तिने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याकडून संपर्कच बंद झाला. शेवटी आपणास 2.69 कोटींचा गंडा घातल्याचे तिच्या ध्यानात आले. त्यांनतर तिने गोवा पोलिसांच्या सायबर विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली असून तपास सुरू केला आहे.