नाशिक : मनमाड परिसर लपला धुक्याच्या दुलईत; पारा 10 अंशावर | पुढारी

नाशिक : मनमाड परिसर लपला धुक्याच्या दुलईत; पारा 10 अंशावर

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

काश्मीर तसेच हिमालयाच्या खोऱ्यातील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून येत असलेल्या शीतलहरींमुळे गेल्या दोन दिवसांपासून शहर, परिसरासह ग्रामीण भागात थंडीसोबत दाट धुक्याची लाट आली आहे. तापमानात मोठी घट होऊन, पारा 10 अंशांवर आला असून या मोसमातील हा नीचांक ठरला आहे. थंडीपासून बचावासाठी शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

दाट धुक्यामुळे सूर्यदेखील चंद्रासारखा दिसत आहे. थंडीमुळे मॉर्निंग वाक आणि व्यायाम करणाऱ्यांची संख्या घटली आहे. एरवी सकाळी लवकर सुरू होणारी हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आता सूर्य उगवल्यावर उशिरा उघडत आहेत. थंडीचा परिणाम शाळेतील हजेरी पटावर होत असून, सकाळी शाळेत व शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सकाळी असलेल्या शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. दुसरीकडे व्यायामशाळेत तरुणाची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. स्वेटर, मफलर आदी गरम व उबदार कपड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या थंडीचा सर्वाधिक फटका गहू, कांदा, हरभरा पिकांना बसत असून, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कधी ढगाळ वातावरण, तर कधी अवकाळी पाऊस, तर कधी कडक ऊन आणि आता ढगाळ वातावरणासोबत कडाक्याची थंडी आणि दाट धुके अशा बदलणाऱ्या हवामानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार थंडी, ढगाळ वातावरण आणि दाट धुके याचा फटका द्राक्षबागांना बसून मण्यांना तडे जात असल्याचे पाहून बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेकोट्या पेटवून बाग वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button